शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्धकी प्रमुख भूमिकेत आहे. मराठी जनतेच्या हृदयावर राज्य करणाऱ्या बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन कशी साकारणार? त्यानं या चित्रपटासाठी कशी मेहनत घेतली याचं कुतूहल आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. प्रेक्षकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं नवाजनं नुकतीच एका मुलाखती दरम्यान उलगडली आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे साकारतानाचा त्याचा अनुभवही त्यानं प्रेक्षकांना सांगितला आहे.
‘ ठाकरे चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान आपण अक्षरश: बाळासाहेबांसारखं आयुष्य जगलो. कधी कधी काही प्रसंग साकारताना बाळासाहेबच संचारायचे असंही वाटायचं, त्यांचा आशीर्वाद पाठी होता म्हणूनच मी त्यांची भूमिका करण्याचं आव्हान पेलू शकलो’ असं म्हणत नवाजनं आपला अनुभव व्यक्त केला. ‘यापूर्वी कधीही बाळासाहेबांची प्रत्यक्षात भेट झाली नाही म्हणूनच ही भूमिका साकारण्याचं मोठं आव्हान माझ्यापुढे होतं ही भूमिका साकारताना बाळासाहेबांनी कुठेही नक्कल होत नाही याची काळजी मला वाटायची असं म्हणत नवाजनं मनातली त्यावेळची भीतीही बोलून दाखवली.
‘मात्र बाळासाहेब साकारताना जसं मोठं आव्हान समोर होतं तसंच त्यांच्यातील काही गोष्टी खूपच मनाला भावल्या होत्या. त्या गोष्टी, त्यांच्यातले गुण आजही मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो अशी प्रांजळ कबुलीही नवाजनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. ‘बाळासाहेब जसे होते तसेच लोकांसमोर आले . जे आहे ते आहे असा त्यांचा रोखठोक स्वभाव मला खूपच आवडायचा. त्यांचा तो गुण मी नेहमीच आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांची भूमिका साकारताना आपण त्या भूमिकेत इतके समरस झालो की त्याच्या अटिट्यूड अनेकदा घरी वावरतानाही यायचा. मी घरात मोठा असल्यानं बरेचदा वागण्या बोलण्यातही तसाच लहेजा यायचा असंही नवाजनं या मुलाखतीनिमित्तानं कबुल केलं.
नवाजनं या चित्रपटासाठी खास मराठी भाषेचं प्रशिक्षणही घेतलं. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत २५ जानेवारीला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होत आहे.