दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं ‘अॅन ऑर्डिनरी लाइफ’ हे चरित्र चांगलंच चर्चेत आहे. नवाजच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी यामध्ये स्पष्टपणे मांडल्या आहेत. यामुळे काही वादविवादसुद्धा झाले. या चरित्रात्मक पुस्तकामुळे तो कायद्याच्या कचाट्यातही सापडण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीतल्या एका वकीलाने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
वकील गौतम गुलाटी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे (NCW) नवाजुद्दीनविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी निहारिका सिंगचा उल्लेख केला आहे. ‘मिड डे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गुलाटी म्हणाले की, ‘मी निहारिका सिंगला व्यक्तिगतरित्या ओळखत नाही आणि मी तिच्याशी कधी बोललोही नाही. मात्र, लग्न झालेलं असतानाही नवाजुद्दीनने निहारिकासोबतचं नातं त्याच्या पत्नीपासून लपवलं. अशा वेळी चरित्रात यासंदर्भात उल्लेख करण्यापूर्वी विचार केला पाहिजे होता. फक्त काही पैसे कमावण्यासाठी आणि आपल्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी त्याने एका महिलेच्या अब्रूला धक्का पोहोचवला आहे.’
वाचा : ‘केबीसी’च्या अंतिम आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार ‘सरप्राइज’
नवाजुद्दीनने ‘मिस लव्हली’ या चित्रपटात अभिनेत्री निहारिका सिंह हिच्यासोबत काम केले होते. २०१२ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीसोबत नवाजुद्दीनचे शारीरिक संबंध होते, असं या पुस्तकात लिहिलं आहे. जवळपास एक वर्ष निहारिकासोबत अफेअर असल्याचं त्याने त्यात स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे काही महिन्यांच्या अफेअरनंतर त्याच्या वाईट स्वभावामुळे ब्रेकअप केल्याचं निहारिकाने म्हटलं. नवाजुद्दीन त्याचे पुस्तक विकण्यासाठी, त्याचा खप वाढवण्यासाठी एका महिलेचं शोषण करत आहे, तिचा अपमान करत आहे, असं मत मांडत अभिनेत्री निहारिका सिंगने त्याच्यावर टीकासुद्धा केली होती.