शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांना भेटीला येणार आहे. काही आठवड्यांपूर्वीच या सिनेमाचा हिंदी तसेच मराठीमधील ट्रेलर मुंबईमधील एका सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लॉन्च करण्यात आला. मात्र मराठी ट्रेलरमधली सर्वांत महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना खटकली ती म्हणजे बाळासाहेबांचा आवाज. अनेकांना हिंदीमध्ये नवाजुद्दीन सिद्दकीने दिलेला आवाज रुचला असला तरी मराठीमध्ये सचिन खेडेकरने बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी दिलेला आवाज खटकला. बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वापेक्षा हा आवाज अगदीच नाजूक वाटतो अशा संदर्भातील अनेक कमेन्ट सोशल नेटवर्किंगवर आल्या. त्यानंतर मराठीमधील सिनेमासाठी आता चेतन शशितल यांचा आवाज देण्यात येणार असल्याचे समजते. मात्र मराठी सिनेमातील बाळासाहेबांच्या आवाजाबद्दल बोलातना शिवसेना खासदार आणि सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांनी मराठी सिनेमालाही नवाजुद्दीन सिद्दीकीच आवाज देणार होता अशी माहिती दिली.

मराठीमध्ये सचिन खेडेकर यांनी दिलेल्या आवाजावरून बरीच टिका झाल्यानंतर बीबीसी मराठीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमातील आवाजाबद्दलचे स्पष्टिकरण दिले. खेडेकर यांच्या आवाजाबद्दल आम्ही स्वत: समाधानी आहोत असं राऊत यांनी सांगितले. मात्र त्याचबरोबर त्यांनी मराठीमधील बाळासाहेबांचा आवाज बदलण्यात येईल का याबद्दल स्पष्टपणे काहीही उत्तर दिले नाही. यावेळेस बोलताना त्यांनी हिंदीमध्ये नवाजुद्दीनचाच आवाज राहिल हे स्पष्ट केले. पण त्याचबरोबर मराठीमध्येही नवाजुद्दीनचाच आवाज राहवा यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचेही सांगितले. ‘मराठीमध्येही नवाजुद्दीनचाच आवाज ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी नवाजुद्दीन मराठी शिकले. बोलायला लागले. तरी मराठी बोलताना उच्चारात जो सफाईदारपणा असायला पाहिजे तो त्यांच्या बोलण्यात नव्हता. हा सफाईदारपणा बाळासाहेबांच्या वक्तव्यात नेहमी असायचा. मात्र नवाजुद्दीन सफाईदारपणे मराठी बोलण्यात थोडेसे कमी पडले. नाहीतर नवाजु्द्दीन यांचा आवाज तेथे चालला असता असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. आता आम्ही मराठीमधील आवाजावर काम करत असून येत्या दोन तीन दिवसात याबद्दलचा निकाल लागेल अशी माहिती राऊत यांनी दिली.

बाळासाहेबांचा बुलंद आवाज मराठी चित्रपटात जमलाच नाही अशा शब्दांत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी व्यक्त करत असतानाच अनेकांनी आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे चेतन शशितल यांच्या आवाजात पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचं डबिंग करा अशी जोरदार मागणी सध्या सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे आता पुढील दोन तीन दिवसामध्ये या सिनेमातील आवाज कुणाचा याबद्दल कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Story img Loader