दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनताराने काही दिवसांपूर्वी जुळ्या मुलांची आई झाल्याची गोड बातमी दिली. तिचा पती दिग्दर्शक विग्नेश शिवन याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. जुळ्या मुलांचे आई-वडील झाल्याची घोषणा केल्यानंतर ते दोघेही चर्चेत आले आहेत. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांनी त्यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सर्व प्रकरणानंतर तामिळनाडू सरकारने चौकशी केली होती. नुकतंच त्यामागील सत्य समोर आले आहे.

विग्नेशने ९ ऑक्टोबर रोजी ट्विटरवर एक ट्विट केले होते. या ट्वीटद्वारे त्यांनी आई-वडील झाल्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यांनी त्यांच्या बाळांच्या पायाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नयनतारा-विग्नेश हे सरोगसीच्या माध्यमातून आई-वडील झाले आहेत. नुकतंच त्या दोघांनी याबद्दल तामिळनाडू आरोग्य विभागाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात नमूद केलेल्या माहितीनुसार, आम्ही दोघांनी ६ वर्षांपूर्वीच नोंदणी पद्धतीने लग्न केले होते.
आणखी वाचा : लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच अभिनेत्री नयनतारा झाली आई, घरी जुळ्या मुलांचे आगमन

तामिळनाडूचे आरोग्यमंत्री यांनी सरोगसी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या जोडप्याची चौकशी केली असता ही बाब समोर आली. सध्याच्या कायद्यानुसार, ज्या जोडप्यांना लग्नानंतर पाच वर्षापर्यंत मूल होत नसेल त्यांनाचा सरोगसीच्या पर्यायाचा अवलंब करता येतो. नयनतारा आणि विग्नेशने यांनी सहा वर्षांपूर्वी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. त्याचे कागदपत्र त्यांनी या प्रतिज्ञापत्रात सादर केले आहेत. त्यावरुन त्यांचा विवाह हा ६ वर्षांपूर्वीच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा : “योग्य वेळीच…” नयनताराचा पती विग्नेशचे सरोगसीसह इतर चर्चांवर स्पष्ट शब्दात उत्तर

चेन्नईतील एका रुग्णालयात नयनतारा-विग्नेशनच्या जुळ्या मुलांचा जन्म झाला, त्याचीही माहिती यात नमूद करण्यात आली आहे. तसेच दुबईत राहणाऱ्या एका मल्याळी महिलेने त्या जुळ्या मुलांना जन्म दिल्याचेही समोर आले आहे. सध्या आरोग्य संचालकांनी स्थापन केलेले पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

दरम्यान नयनतारा आणि विघ्नेश यांनी ९ जून रोजी चेन्नईत लगीनगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नाला चार महिने उलटत नाही तोपर्यंत नयनताराने चाहत्यांना दुसरी गुडन्यूज दिली. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच ती आई झाली आहे, अशी अधिकृत घोषणा त्या दोघांनी केली. नयनताराच्या घरी दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. उईर आणि उलगम अशी त्यांच्या दोन्ही मुलांची नाव आहेत.

Story img Loader