स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. अल्पावधीच यशाच्या शिखरावर पोहचलेल्या या मालिकेमध्ये किरण माने हे त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी साडपले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. या सगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये धनंजय म्हणाले, “आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून किरण मानेंसारखा अभिनेता राजकीय विषयावर व्यक्त झाला म्हणून राजकीय दबावाला आणि ट्रोलिंगला बळी पडून स्टार प्रवाहने त्यांना काढून टाकणे म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण आहे.” आपण त्यांच्या पाठीमागे असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी माने यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.
दरम्यान, किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. किरण मानेंनी एका दैनिकाशी बोलताना, “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिली,” असं म्हटलंय. किरण मानेंनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.
त्यानंतर सोशल मीडियावर किरण मानेंविरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी उघडपणे किरण मानेंना या प्रकरणामध्ये पाठिंबा दर्शवलाय. अनेकांनी या कारवाईला संस्कृती दहशतवाद असं म्हटलंय. “राजकीय भूमिका घेतल्याने आपल्या सर्वांचे लाडके किरण माने सरांना यांना स्टार प्रवाहाने मालिकेतून काढून टाकले आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद नाही का..?,” असा प्रश्न तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारा खास रे या फेसबुक पेजवरुन विचारण्यात आलाय. “जो माणूस वास्तव आणि न्यायाच्या बाजूने उभा राहतोय,जो माणूस तुमच्या आमच्या हक्कासाठी इथ उघडपणे व्यक्त होतोय, ज्यावेळी गरज असते त्यावेळी इतर कलाकार गप्प बसलेले असताना हा माणूस तुमचा माझा आवाज बनून आपली लेखणी आपल्यासाठी झिजवतो आहे…त्या माणसासाठी आता आपण सर्वांनी उभे राहायची गरज आहे,” असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.