खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे क्रूर औरंगजेबाने केलेला कपटीपणा आणि छत्रपती शिवरायांनी बुद्धीचातुर्य जोरावर आग्र्याहून केलेली स्वत:ची सुटका या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार प्रेक्षकांना होता येत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या दमदार कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेला सुटकेचा थरार पाहायला मिळत आहे. या चित्रपटानंतर अमोल कोल्हेंचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. नुकतचं अमोल कोल्हे यांनी या चित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कशाप्रकारे पाठिंबा दिला, याबद्दल भाष्य केले.
‘सकाळ’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमोल कोल्हे यांना शरद पवारांबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. शरद पवार यांनी हा चित्रपट पाहिला का? किंवा या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान त्यांनी तुम्हाला काय सल्ले दिले? असेही त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
आणखी वाचा : “खासदार अमोल कोल्हे यांचा…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
“आदरणीय शरद पवारांच्या बाबतीत मला फार आदर आहे त्यामागचे कारण म्हणजे ते कधीच हस्तक्षेप करत नाही. या कलाकृतीतून हे सांगितलं गेलं पाहिजे, असे ते कधीही करत नाही. वाराणसीचं शिवमंदिर पाडलं जाणं हा सीन चित्रपटात आहे. त्यामुळे कुठेही राजकीय रंग भरण्याचा प्रयत्न नसतो. आधी ते चर्चा करत नाहीत.
त्यांनी पुण्यातील प्रिमिअरला हा संपूर्ण चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली ती खूप काही सांगून गेली. ‘अनेक वर्षांनी इतका सर्वांग सुंदर चित्रपट बघता आला.’ असे शरद पवार मला म्हणाले. ही माझ्यासाठी फार मोठी प्रतिक्रिया होती. त्यांनी इतकी वर्षे राजकारणात, समाजकारणात घालवली आहेत. पण त्यांना विरंगुळा म्हणून हा चित्रपट बघायला आवडतो आणि तो त्यांना भावतो, आवडतो”, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. ते कधीही मत लादत नाही, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो. कलाकाराला जे व्यक्ती स्वातंत्र्य लागतं ते पुरेपुर देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो., असे अमोल कोल्हे म्हणाले.
विशेष म्हणजे शरद पवारांनी ट्वीटरवर याबद्दल एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात त्यांनी चित्रपट बघतानाचा एक फोटो शेअर केला आहे. “खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या आगामी चित्रपटाचे प्रीमियर सादरीकरण काल पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे, कौशल्याचे आणि तल्लख बुद्धीमत्तेचे यथायोग्य वर्णन चित्रमाध्यमात करण्यात आले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह चित्रपटातील सर्व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट भूमिका केली आहे. सर्व कलावंतांचे परिश्रमपूर्वक सकस चित्रपट निर्मिती केल्याबद्दल अभिनंदन व यशस्वीतेसाठी शुभेच्छा!” असे ट्वीट त्यांनी केले होते.