दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. या चित्रपटावरुन अनेक सेलिब्रिटींनी, राजकारण्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या या चित्रपटाच्या वादावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केले होते. सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे, असा आरोप मोदींनी केला होता. त्यानंतर आता एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केले आहे.
काश्मिरमधील एक घटक निघून गेला,त्यावर एक सिनेमा आला, काँग्रेसवर टीका झाली.मन जोडण्याऐवजी मन तोडण्याच काम झालं, समाजात विद्वेष पसरायला मदत केली जाते.गांधींवर टीका टिप्पन्नी या चित्रपटाच्या माध्यमातून केली जाते.काश्मीर मधून काश्मीर पंडित बाहेर पडलेत तेव्हा सत्तेत कोंग्रेस नव्हता, तर व्हीपी सिंह यांची सत्ता होतीभाजपचा त्याला सहकार्य होते, म्हणजे भाजपच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेलेत.
“काश्मीरची खरी फाईल काय आहे हे…”; The Kashmir Files चित्रपटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
“काही लोकांनी एक मोहीम सुरू केली आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला. त्यावर एक सिनेमा आला आहे. त्या सिनेमातून मन जोडण्याऐवजी मन विचलित कशी होतील, अंतर कस वाढेल, विद्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी करण्यात आली आहे. ज्या वेळेला समाजामध्ये विद्वेष वाढवण्याची भूमिका कोणी मांडत असेल आणि ती भूमिका चित्रपटात सांगितली गेली असेल तो चित्रपट बघितला पाहिजे, तो अतिशय चांगला आहे असे जर देशाचे पंतप्रधान म्हणण्याला लागले तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी, ठेवायची कशी हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत,” असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, काश्मीर खोऱ्यमतून १९९०मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपाच्या अजेंडय़ावरही राहिलेला आहे. या चित्रपटावर काँग्रेसने तसेच, काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकुल मते व्यक्त केली आहेत. या विरोधाचा संदर्भ देत, मोदींनी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले होते.
“जे नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन फिरतात, ते गेल्या ५ ते ६ दिवसांत पूर्णपणे घाबरले आहेत. वस्तुस्थितीच्या आधारे या चित्रपटावर चर्चा करण्याऐवजी ते बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण इकोसिस्टम या चित्रपटाच्या विरोधात उभी राहिली आहे. जे सत्य आहे ते समोर आणणे देशाच्या हिताचे आहे. कोणाला या चित्रपटावर आक्षेप असेल तर दुसरा बनवा. इतकी वर्षे दडपलेले सत्य बाहेर कसे आणले जात आहे, असा त्यांचा आक्षेप आहे. अशा वेळी या पर्यावरण व्यवस्थेशी लढण्याची जबाबदारी सत्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या लोकांची आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते.