सर्वोत्तम, दर्जेदार आणि निवडक मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने ‘नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिग आर्ट्स’ (एनसीपीए)च्या वतीने दरवर्षी ‘नवे वळण’ या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या महोत्सवाचे सहावे वर्ष असून ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान एनसीपीएतील ‘लिटिल थिएटर’ येथे या महोत्सवातील चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
या वर्षी या महोत्सवात सहा मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. ४ ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता सुजय डहाके दिग्दर्शित आणि ऊर्मिला मातोंडकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आजोबा’ या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ होईल. रविवारी, ५ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता गजेंद्र अहिरे लिखित, दिग्दर्शित ‘पोस्टकार्ड’ हा चित्रपट दाखवण्यात येईल. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता गजेंद्र अहिरे यांचाच ‘अनवट’ हा थरारपट दाखवण्यात येणार आहे. सोमवारी, ६ ऑक्टोबरला चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘दुसरी गोष्ट’, मंगळवारी, ७ ऑक्टोबरला श्रीहरी साठे दिग्दर्शित ‘एक हजाराची नोट’ आणि बुधवारी ८ ऑक्टोबरला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँ ड्री’ चित्रपट दाखवण्यात येणार आहे. हे तिन्ही चित्रपट संध्याकाळी ६.३० वाजता दाखवण्यात येणार आहेत.
प्रत्येक चित्रपटानंतर ‘चौराहा’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि त्यांच्या चमूशी थेट संवाद साधण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncpa film festival