प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन त्यांच्याच एन.डी. स्टुडिओत आयुष्य संपवलं. अत्यंत दुर्दैवी म्हणावी अशी ही घटना आज (२ ऑगस्ट) घडली. नितीन चंद्रकांत देसाई यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ या आणि अशा अनेक सिनेमांसाठी कला दिग्दर्शन केलं. त्यांना त्यांच्या कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं. नितीन चंद्रकांत देसाई यांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी उभारलेला मंच. अवघ्या २० तासांमध्ये त्यांनी ही व्यवस्था केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील हे नक्की झाल्यानंतर नितीन देसाई यांनी अवघ्या २० तासांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवाजी पार्क मैदानावर भव्य असा मंच उभारला होता. छत्रपती शिवरायांची सिंहासनावर बसलेली मूर्ती हे या मंचाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं होतं.

नितीन देसाई याविषयी काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार होते. त्या सोहळ्यासाठी आम्हाला मंच उभा करायचा होता. आमची एक बैठक झाली. त्यानंतर मी त्यांच्या समोर बसूनच एक मॉडेल तयार करुन घेतलं. हे मॉडेल उद्धव ठाकरेंना खूप आवडलं. त्यानंतर आम्ही तयारीला लागलो. आमच्याकडे फक्त २० तास होते. उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाची शपथ हा मोठा क्षण होता. त्यामुळे आम्ही असा सेट तयार केला. ” या मॉडेलचा व्हिडीओ नितीन देसाई यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केला होता. उद्धव ठाकरे हे स्वतः कलाकार आहेत. मी त्यांच्यासाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या आवडी-निवडी या गोष्टी मला ठाऊक होत्या. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शपथविधीचा सेट आम्ही डिझाईन केला. असं नितीन देसाईंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

नितीन देसाई यांनी आज आत्महत्या केली. नितीन देसाई यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. कला दिग्दर्शन सारख्या वेगळ्या क्षेत्रात नितीन देसाई यांनी मोलाचं काम केलं आहे. गेल्या ३० वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी सांभाळली आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केले आहेत. कला दिग्दर्शन या क्षेत्राला ग्लॅमर मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

ऐतिहासिक चित्रपट आणि मालिका म्हणजे नितीन देसाई यांचे कला दिग्दर्शन आणि भव्य सेट्स हे समीकरणच बनले होते. पुढे हेच ऐतिहासिक सेट्स आणि कलात्मक वस्तू एकत्र करत त्यांनी २००५ मध्ये कर्जत येथे भव्यदिव्य एन. डी. स्टुडिओ उभारला. चित्रपटातील भव्य दिव्य सेट्सची ही अद्भुत दुनिया एन. डी. स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्व सामान्यांनाही खुली करून दिली होती. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेल्या नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकाबरोबर काम केले होते. राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकेबरोबरच बालगंधर्व या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nd studio art director nitin desai made stage for maharashtra ex cm uddhav thackeray oath ceremony scj