अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्या नेहमीच त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि मुलगी मसाबाला एकल आई म्हणून वाढवण्याबद्दलही बोलत असतात. नीना गुप्ता या वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सबरोबर रिलेशनशिपमध्ये होत्या. तेव्हाच त्या गरोदर राहिल्या, पण नीना यांनी लग्न न करताच बाळाला जन्म दिला. अलीकडेच नीना यांना ती वेळ आठवली, जेव्हा त्यांनी त्यांचा जोडीदार व वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सला गरोदरपणाबद्दल माहिती देण्यासाठी फोन केला होता.
विवियनचं लग्न झालं होतं, पण तरीही त्याने नीना यांना बाळाला जन्म देण्यास सांगितलं. पण नीना यांच्या कुटुंबाने मात्र सुरुवातीला त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला नाही, परंतु शेवटी त्यांच्या वडिलांनी पाठिंबा दिला आणि मग कुटुंबातील इतरांनीही पाठिंबा दिला. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी विवियनशी झालेल्या संभाषणाची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, “गरोदर असल्याचं कळल्यावर मला खूप आनंद झाला होता, असं नाही. मी आनंदी होते, कारण मी त्याच्यावर प्रेम केलं. मी त्याला फोन केला आणि विचारलं की ‘तुला हे मूल नको असेल तर मलाही नकोय’. तो म्हणाला, ‘मला हे मूल तुझ्यासाठी हवंय’. सर्वांनी मला सांगितलं, ‘नाही, बाळाला जन्म देऊ नकोस, तू एकटी सगळं कसं करू शकणार?’ कारण तो आधीच विवाहित होता आणि मी त्याच्याशी लग्न करू शकत नव्हते आणि तिथे राहण्यासाठी अँटिग्वाला जाऊ शकत नव्हते. पण जेव्हा तुम्ही तरुण असता ना तेव्हा तुम्ही आंधळे असता. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही कोणाचंही ऐकत नाही. कोणतीही मुलं त्यांच्या पालकांचं ऐकत नाहीत आणि मीही तशीच होते.”
नीना यांनी मुलीला लहानपणीच तिच्या वडिलांबद्दल सांगितलं होतं. “आम्ही (मी आणि विवियन) कधी कधी संपर्कात होतो, कधी नाही. पण मी मसाबाला सगळं मोकळेपणानं सांगितलं. मुलांना खरं सांगणं महत्वाचं आहे, त्यांना इतर कुणीही सांगू शकतं, त्याऐवजी आपण सांगितलेलं चांगलं,” असं नीना म्हणाल्या.
नीना आणि विवियन जयपूरमध्ये एका चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना भेटले होते. जयपूरच्या राणीने चित्रपटाच्या कलाकारांना आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला जेवायला बोलावलं होतं, तेव्हा त्यांची विवियनशी भेट झाली. दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर नीना गरोदर राहिल्या. त्यांच्या मुलीचं नाव मसाबा गुप्ता असून ती आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे.