बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन सृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या नीना गुप्ता त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत राहत असतात. अशातच त्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.
नीना गुप्ता यांनी नुकतंच भारतातील महिला आणि स्त्रीवादाबद्दल भाष्य केलं आहे. याबद्दल बोलताना त्यांनी महिलांनी नोकरी केली तर त्यांच्यावर बलात्कार होतो असं म्हटलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे. तसंच त्यांनी सेक्सबद्दलही भाष्य केलं आहे. नीना यांनी लीली सिंगला दिलेल्या मुलाखतीत स्त्रीवाद म्हणजे काय असं विचारण्यात आलं.
यावर नीना गुप्ता म्हणाल्या की, “माझ्यासाठी, स्त्रीवाद म्हणजे सशक्त आणि खंबीर असणे होय. माझ्यासाठी हेच स्त्रीवाद आहे”. यानंतर त्यांना “तुम्हाला या देशात महिलांसाठी काय hava आहे?” यावर नीना यांनी उत्तर दिले की, “मला जे हवे आहे ते शक्य नाही. मला वाटते की, त्या सुरक्षित राहाव्यात, पण ते शक्य नाही. ते म्हणतात की महिलांना शिक्षित करा. पण जर तुम्ही त्यांना शिक्षित केले, तर त्यांना नोकरी करायची इच्छा होईल आणि जर त्यांनी नोकरी केली तर त्यांच्यावर बलात्कार होतो.

यापुढे त्या म्हणाल्या की, “मला वाटते की, स्त्री म्हणून जन्म घेणं हा एक शाप आहे, विशेषतः गरीब स्त्री म्हणून जन्म घेणं. परिस्थिती इतकी दुःखद आहे की अंगावर शहारे येतात. जेव्हा मला खरी परिस्थिती माहित असते तेव्हा मी आशावादी गोष्टी कशा बोलू शकते? यावर मला एक उपाय हवा आहे. पण तो उपाय मला सुचत नाहीय.”

पुढे नीना यांनी भारतीय महिला आणि सेक्सविषयी भाष्य करताना म्हटलं की, “भारतात शारीरिक संबंधांना सर्वाधिक महत्व दिलं जातं. मला ९५ टक्के भारतीय महिलांसाठी फार वाईट वाटतं, कारण त्यांना माहिती नाही की सेक्स आनंदासाठी आहे. अनेक महिलांना असं वाटतं की, सेक्सची गरज फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी आणि आपल्या पतीला आनंदित ठेवण्यासाठीच आहे.”
दरम्यान, नीना गुप्ता त्यांच्या फिल्मी करियरमुळे नाही तर, त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिल्या आहेत. ‘पंचायत’ वेबसीरीजमुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शिवाय नीना यांना ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरीजमध्येही काम केलं आहे. तर ‘बधाई हो’, ‘गुडबाय’, ‘वध’, ‘स्वर्ग’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘दर्द’, ‘मिर्झा गालिब’ सारख्या अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे