सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट खूप गाजला. भारतासह परदेशातील प्रेक्षकांना त्याच्या स्टाईलचे वेड लागले आहे. या चित्रपटामधील त्याच्या ‘झुकेगा नही साला’ या डायलॉगची क्रेझ अजूनही तशीच आहे. अल्लू अर्जुनचे चाहते या चित्रपटाच्या सिक्केलची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सुरु होणार असून ‘पुष्पा २’ डिसेंबर महिन्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती.
‘पुष्पा’ या चित्रपटामुळे अल्लू अर्जुन ग्लोबल स्टार बनला. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याच सुमारास सीएनएन न्यूज १८ आयोजित एका कार्यक्रमामध्ये अल्लू अर्जुनला खास आमंत्रण देण्यात आले. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. तेथे अल्लू अर्जुनचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा देखील उपस्थित होता. कार्यक्रमादरम्यान नीरजने त्याची भेट घेतली. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा – भर पावसात थिरकली करिष्मा कपूर, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…
या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन आणि नीरज चोप्रा कॅमेऱ्यासमोर फोटो काढण्यासाठी एकत्र आले असे दिसत आहे. पुढे नीरज ‘मी तुमची पुष्पामधली हाताची अॅक्शन करतो आणि तुम्ही माझी भाला फेकायची अॅक्शन करा’, असे म्हणाला. त्यावर अल्लू अर्जुन हसला. त्या दोघांनी पुष्पाची सिग्नेचर स्टेप केली. पुढे हात मिळवत त्यांनी फोटोसाठी पोझ दिली. या कार्यक्रमामध्ये अभिनेता रणवीर सिंहही उपस्थित होता.
टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक कमावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. या कामगिरीमुळे त्याच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. मागच्या महिन्यामध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठित डायमंड ट्रॉफीमध्ये त्याने सहभाग घेतला होता. लीगच्या अंतिम टप्प्यामध्ये ८८.४४ मीटर भालाफेक करत त्याने सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर दुखापतीच्या कारणास्तव त्याला या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागली होती.