बॉलीवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करने (Neha Kakkar) आजवर आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेक हिंदी-पंजाबी गाण्यांना तिचा आवाज लाभला असून तिच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. चित्रपट व अल्बम्समध्ये गाणं गाण्याशिवाय गायिका अनेक ठिकाणी गाण्याचे लाईव्ह शोजही करत असते आणि तिच्या या लाईव्ह शोला रसिकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो.
नेहा कक्करचे केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही गाण्याचे अनेक लाईव्ह शो होत असतात. अशातच नुकताच मेलबर्नमध्ये तिच्या गाण्याचा शो होता. मात्र, या शोच्या आधी ती रडताना दिसली. याचं कारण म्हणजे गायिका या शोसाठी तब्बल तीन तास उशिराने पोहोचली. नेहा तीन तास उशिरा पोहोचल्यानंतर तिने सर्व रसिक श्रोत्यांची माफी मागितली. पण, रसिकांनी तिचं काही ऐकून न घेता आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर सध्या नेहाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ती रसिकांची माफी मागत रडताना दिसत आहे, पण श्रोते तिचे ऐकून घेण्यास तयार नाहीत असं या व्हिडीओमधून दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती रसिकांना असं म्हणते की, “मला हे आवडत नाही, मी माझ्या आयुष्यात कधीही कोणालाही वाट पाहायला लावली नाही. तुम्ही इतकी वाट पाहत आहात याबद्दल मला खूप वाईट वाटलं! ही संध्याकाळ मला नेहमीच आठवेल. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप वेळ काढला आहे, त्यामुळे मी आता तुमचं अधिक मनोरंजन करेन याची खात्री देते.”
नेहाच्या या कृतीवर काही चाहत्यांनी तिचे सांत्वन केले. पण, काहींनी मात्र याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. व्हिडीओमधील गर्दीतून संतप्त आवाज ऐकू येत होते, ज्यात काही लोक “परत जा!” असे ओरडताना दिसत आहेत. तसंच एकाने “तुमच्या हॉटेलमध्ये आराम करा” असं म्हटलं आहे. तसंच अनेकांनी “आम्ही तीन तासांपासून वाट पाहत आहोत”, “छान अभिनय करताय”, “हे इंडियन आयडल नाही”, “तू मुलांबरोबर परफॉर्म करत नाहीस”, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
नेहा कक्करने मेलबर्नमधील गाण्याच्या कार्यक्रमाआधी सिडनीमध्ये खास परफॉर्मन्स सादर केला, याचे काही खास क्षण तिने इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केले आहेत. त्यानंतर ती मेलबर्नमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी जाणार होती, पण इथे पोहोचण्यास तिला उशीर झाला. उशीर झाल्यामुळे तिला अश्रू अनावर झाले. याबद्दल तिने चाहत्यांची माफीही मागितली, पण तरीदेखील सोशल मीडियावर काही जणांकडून तिला टीकेला सामोरे जावे लागले.