देशात करोनाचा कहर सुरुच आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही करोनाची लागण झाली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता नील नितीन मुकेश याच्या संपूर्ण परिवाराला करोनाची लागण झाली आहे. त्यात त्याच्या २ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
नीलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये नील म्हणतो, “सर्व प्रकारची काळजी घेऊनही आणि घरात राहूनही माझ्या परिवारातले सदस्य आणि मला करोनाची लागण झाली आहे. आम्ही सर्वजण सध्या विलगीकरणात आहोत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहोत. त्याचप्रमाणे सर्व कोविड संबंधित नियमांचं पालनही करत आहोत. तुमचं प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.”
View this post on Instagram
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “तुमचं प्रेम आणि आशिर्वादाची गरज आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. हलक्यात घेऊ नका.”
आजतकच्या वृत्तानुसार, नीलने एका मुलाखतीत सांगितलं, “नूरवीलाही करोनाची लागण झाली आहे ह्या गोष्टीने मी अस्वस्थ आहे. तिचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुदैवाने तिला आता काही त्रास नाही. दोन दिवसांपूर्वीपासून तिला ताप होता. म्हणूनच आम्ही टेस्ट केली. माझे वडिल, भाऊ, रुक्मिणी आणि नूरवी सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. फक्त माझी आई व्यवस्थित आहे.”
नुकतंच अभिनेता अर्जुन रामपाललाही करोनाची लागण झाली आहे. डिझायनर मनिष मल्होत्रा, अभिनेता सुमीत व्यास हेही करोनाबाधित आहेत. तर अनेक कलाकारांनी करोनावर मात केली आहे. अभिनेता अक्षय कुमार, आलिया भट्ट, कतरिना कैफ, विकी कौशल, भूमी पेडणेकर यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.