नेपाळ भूकंपाच्या प्रलयात क्षणागणिक मृतांचा आकडा वाढत जात असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे हिच्या आगामी चित्रपटाच्या कर्मचारी गटातील (क्रू टीम) आठ जणांचा नेपाळ भूकंपात दुर्देवी मृत्यू झाला आहे. याची माहिती खुद्ध मुग्धाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी मुग्धा आणि सहकलाकार रुसलान मुमताज आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करून नेपाळहून मायदेशी परतले होते. मात्र, पुढील काही कामानिमित्त चित्रपटाची टीम नेपाळमध्येच थांबली होती. शनिवारी नेपाळमध्ये आलेल्या प्रलयकारी भूकंपाच्या तडाख्यात मुग्धाच्या चित्रपटासाठी काम करणारी टीम सापडली आणि यात  ८ कर्मचाऱयांचा दुर्देवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भूकंपात बळी पडलेल्यांचा आकडा दहा हजारांपर्यंत जाण्याची शक्यता नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी वर्तवली आहे. आतापर्यंत चार हजारांहून अधिक जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

Story img Loader