नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (१५ जानेवारी) ‘येती’ एअरलाईन्स एअरक्राफ्ट या कंपनीच्या विमानाला मोठा अपघात झाला. विमानात असलेल्या सर्व ७२ लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. यातील पाच भारतीय होते. या विमान दुर्घटनेत नेपाळची प्रसिद्ध गायिका नीरा छंत्याल हिचाही मृत्यू झाला. यापूर्वी २०१२मध्ये नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात लोकप्रिय बालकलाकराला तिचा जीव गमवावा लागला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बालकलाकार तरुणी सचदेवने तिच्या क्यूटनेसने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ‘रसना’ या ब्रॅंडच्या जाहिरातीतून तिला लोकप्रियता मिळाली होती. २०१२ साली नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात तरुणी व तिची आई गीता सचदेव यांना प्राण गमवावे लागले होते. तरुणीच्या अपघाताच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. नेपाळमध्ये पुन्हा झालेल्या अपघातानंतर आजतकने तरुणीचे वडील हरीश सचदेव यांच्याशी संपर्क साधला. नेपाळ विमान दुर्घटनेची बातमी ऐकल्यानंतर दहा वर्षांपूर्वीची घटना आठवल्याचं हरीश यांनी सांगितलं.

हेही वाचा>> विश्लेषण : पोखरामध्ये विमान दुर्घटनेत ६८ जणांचा मृत्यू; का आहे नेपाळला अशा भीषण दुर्घटनांचा इतिहास?

“नेपाळमधील विमान अपघाताची बातमी कळताच मला फार राग आला. अजूनही नेपाळमधील यंत्रणा सतर्क झालेली नाही. त्यांची विमाने जुन्या मॉडेलची आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी कुणाच्या जीवाचीही पर्वा हे करत नाहीत. माझी पत्नी व मुलगीही अशाच दुर्घटनेचा शिकार झाल्या होत्या. आजही अशी अपघातांबाबत ऐकल्यानंतर माझ्या अंगावर काटा येतो. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांची अवस्था मी समजू शकतो”, असं ते म्हणाले.

हेही वाचा>> “देवेंद्रजी, बायकोला मराठी बोलायला…”, मकर संक्रांतीच्या शुभेच्छांवरून अमृता फडणवीस ट्रोल

हरीश यांनी तरुणी व पत्नीचा अपघातात झालेल्या मृत्यूबद्दलही भाष्य केलं. ते भावूक होत म्हणाले, “मी तेव्हा मुंबईत होतो. माझी पत्नी व मुलगी नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेले होते. परंतु, तरुणीला नेपाळला जायचं नव्हतं. तिला गोव्याला जाऊन पॅराग्लायडिंग करायचं होतं. माझी पत्नी तिच्या ग्रुपबरोबर नेपाळला चालली होती. त्यामुळे ती तरुणीलाही बरोबर घेऊन गेली. परंतु, काहीतरी विपरीत घडणार असल्याचं तरुणीला आधीच जाणवलं होतं. त्यामुळेच विमानात बसल्यानंतर तिने तिच्या मैत्रिणीला मेसेज केला होता. “समजा जर विमान क्रॅश झालं, तर आताच सांगते आय लव्ह यू”, असं तिने मेसेजमध्ये लिहिलं होतं”.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal plane crash child actress taruni sachdev and her mother died in 2012 plane accident kak