Netflix gets Legal Notice : बिग बँग थिअरी या प्रसिद्ध शोमधल्या एका भागात अभिनेत्री माधुरी दीक्षित विषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी केला आहे. या प्रकरणी मिथुन विजय कुमार यांनी Netflix ला नोटीस बजावली आहे. एवढंच नाही तर मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सने हा भाग हटवावा अशीही मागणी केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बिग बँग थिअरचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या पहिल्याच भागात जिम पार्सन्सने शेल्ड कूपर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. जिम पार्सन्स या शोमध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय या दोघींची तुलना करतो. त्यानंतर त्याने एक वाक्य माधुरीबाबत उच्चारलं हे वाक्यच आक्षेपार्ह आहे असा आरोप मिथुन विजय कुमार यांनी केला आहे. मिथुन विजय कुमार यांनी याबाबतचं एक ट्वीटही केलं आहे.
काय आहे मिथुन विजय कुमार यांचं ट्वीट?
मिथुन विजय कुमार यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “काही दिवसांपूर्वी मी नेटफ्लिक्सवर बिग बँग थिअरी या शोचा एक भाग पाहिला. यामधला एक अभिनेता दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित बाबत बोलताना आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरतो. मी लहानपणापासूनच माधुरी दीक्षित यांचा फॅन आहे. त्यामुळे बिग बँग थिअरीमधली ती कमेंट ऐकून मला वाईट वाटलं. भारतीय संस्कृती आणि स्त्रिया यांचा अपमान झाल्याची भावना माझ्या मनात आली. त्यामुळेच मी माझ्या वकिलामार्फत नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यास सांगितलं. तसंच मी नेटफ्लिक्सला हा भाग काढून टाकण्याचीही विनंती केली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जाईल अशी अपेक्षा आहे.”
मिथुन विजय कुमार यांच्या या ट्वीटची चर्चा चांगलीच होते आहे. नेटफ्लिक्स आता याविषयी कारवाई करणार का? किंवा काही उत्तर देणार का? अथवा नेमकं पाऊल काय उचलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.