साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘अन्नपूर्णी’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, प्रदर्शनाच्या काही दिवसांमध्येच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या दृश्यांमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याच्या आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, चित्रपटाचा वाढता वाद पाहता, नेटफ्लिक्सने चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘अन्नपूर्णी’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, या चित्रपटाबाबतचा वाढता वाद पाहता, नेटफ्लिक्सने हा चित्रपट आता आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे. विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) प्रवक्ते श्रीराज नायर यांनी नेटफ्लिक्सला चित्रपट काढून टाकण्याचा इशाराही दिला होता. दाक्षिणात्य चित्रपट तज्ज्ञ क्रिस्टोफर कनागराज यांनी पोस्ट शेअर करीत ही माहिती दिली आहे. अन्नपूर्णी या चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करीत त्यांनी लिहिले, “एक आठवड्यापूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘अन्नपूर्णी’ चित्रपट आता स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला आहे.
काय आहे नेमका वाद?
हिंदू आयटी सेलचे संस्थापक रमेश सोलंकी यांनी एक्स या समाजमाध्यमावर ‘अन्नपूर्णी’ चित्रपटबाबत काही पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले आहे. यामध्ये नयनताराचा ‘अन्नपूर्णी’ हा सिनेमा हिंदूविरोधी असल्यचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भगवान राम मांसाहारी असल्याचा उल्लेख सिनेमात आला असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. चित्रपटात हिंदू मुलीला बिर्याणी बनवताना आणि नमाज पठण करताना दाखवण्यात आलं आहे, यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील या दृश्यांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर चित्रपट निर्मात्यांसह अभिनेत्री नयनताराविरोधात मुंबई व जबलपूरमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- ‘या’ कारणामुळे नीतू कपूर व आलियात होतात वाद; म्हणाल्या, ” तिची आई सोनी राजदान…”
या वाढत्या वादाबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केले गेलेले नाही. ‘अन्नपूर्णी’ हा तमीळ चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री नयनताराची मुख्य भूमिका आहे. नयताराबरोबर जय, सत्यराज, कार्तिक कुमार आणि रेणुका यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एका महिला शेफच्या आयुष्यावर आधारित आहे.