वेब विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सीक्वलची घोषणा नेटफ्लिक्सच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात आली. या सीक्वलची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता नेटफ्लिक्सने एपिसोड्सची नावं जाहीर केली आहेत.
‘नेटफ्लिक्स इंडिया’ने फेसबुक पेजवर चार वेगवेगळ्या फोटोंसोबत चार नावं दिली आहेत. या चार नावांचा ‘सेक्रेड गेम्स २’च्या एपिसोड्सशी संबंध जोडला जात आहे. ‘बोलो अहं ब्रह्मास्मी, छह दिन में सब कुछ दिखाई देने लगेगा,’ म्हणजेच सहा दिवसांत सगळं काही स्पष्ट दिसू लागेल असं कॅप्शन देत हे चार फोटो शेअर केले आहेत. ‘बिदल ए गीता’, ‘कथम अस्ति’, ‘अन्तर महावन’ आणि ‘अनागमम्’ अशी या चार एपिसोड्सची नावं आहेत. ही नावं पासून सेक्रेड गेम्सच्या सीक्वलमध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं पाहायला मिळणार हे नक्की.
येत्या १ एप्रिलला ‘सेक्रेड गेम्स’च्या सीक्वलसंदर्भात मोठी बातमी येणार आहे. ही बातमी म्हणजे सेक्रेड गेम्सचा नवा सिझन किंवा त्याचा ट्रेलर असू शकते. त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय असतो? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्सने ‘इस बार क्या होगा भगवान भी नहीं जानता’ असं याआधीच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आता कमालीची वाढली आहे.