दिल्लीमधील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण माहिती नाही अशी व्यक्ती सापडणं कठीणच…या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला होता. संपूर्ण देशभरात मोर्चे, कॅण्डल रॅली, निदर्शन करत लोकांनी आपला संताप व्यक्त केला होता. हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. निर्भया प्रकरणानंतर कायद्यातही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. नेमक्या याच घटनेवर आधारित वेब सीरिज ‘दिल्ली क्राइम’ नेटफ्लिक्सने आणली आहे. निर्भया प्रकरण काय आहे, त्यानंतर कशाप्रकारे देशभरात आंदोलनं कऱण्यात आली, आरोपींची अटक या सगळ्या गोष्टी आपण वाचल्या आहेत पण यातील एक गोष्ट दुर्लक्षित झाली ती म्हणजे पोलिसांनी कसून केलेला तपास आणि नेमकी हीच गोष्टी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. घटनेनंतर तपास करताना पोलिसांसमोर उभी राहिलेली आव्हानं, त्यामधील राजकीय हस्तक्षेप, साक्षीदार टिकून रहावा यासाठी केलेला प्रयत्न अशा अनेक गोष्टी दिल्ली क्राइममधून उलगडण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेब सीरिजची सुरुवातच होते ते रस्त्याशेजारी नग्न अवस्थेत पडलेल्या तरुण आणि तरुणीपासून….नंतर पुढील घटनाक्रम वेगाने सुरु होते. डीसीपी वर्तिका चतुर्वैदीच्या भुमिकेत असणारी शेफाली शाह रुग्णालयात पोहोचते तेव्हा झालेला प्रकार ऐकून तिलाही मोठा धक्का बसतो. यानंतर सुरु होतो तो तपास. आरोपींचा शोध घेण्यासाठी शेफाली शाह विशेष टीम नेमते. आरोपींचा शोध लागत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातच ठाण मांडून बसणारी शेफाली शाह पाहताना कुठेही अतिरंजकपणा वाटत नाही. तपास सुरु असेपर्यंत कोणीही घरी न जाण्याची तिने दिलेली ताकीद…इच्छा नसतानाही डीसीपीने आदेश दिल्याने काम करणारे पोलीस कर्मचारी सर्व काही अगदी सत्यतेशी जोडणारं वाटतं.

निर्भया प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना किती आव्हानांना सामोरं जावं लागलं हा या वेब सीरिजचा मुख्य भाग आहे. महत्वाचं म्हणजे पोलीस जीवाची बाजी लावून आरोपींना पकडत आहेत हे दाखवत असताना कामात चुकारपणा आणि आळशीपणा करणारे पोलिसही दाखवण्यात आले आहेत. म्हणजेच तपास कोणी करायचा यामधून पोलिसांमध्ये झालेला वाद. एकीकडे आरोपींचा शोध घेण्यासाठी जीवाची बाजी लावणारे पोलीस तर दुसरीकडे त्याच पोलिसांच्या तपासात आड येणारे राजकारणी. बसमध्ये बलात्कार होत असताना पोलिसांना कसा दिसला नाही असा निर्बुद्ध प्रश्न विचारणारे गृहमंत्री तर दुसरीकडे दिल्ली पोलीस आपल्या अखत्यारित यावेत अशी मागणी करत वारंवार तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि यामध्ये पिचलेले दिल्ली पोलीस.

निर्भया प्रकरणानंतर दिल्लीमधील प्रत्येक मुलीच्या मनात काय भावना होती हे दाखवण्याचा प्रयत्नही वेब सीरिजमधून करण्यात आला आहे. दिल्ली असुरक्षित आहे असा दावा करणारी डीसीपीची मुलगी वारंवार परदेशात जाण्याचा आग्रह धरत असते. मात्र त्यानंतर झालेल्या निर्भया प्रकरणानंतर तिच्या मनात असलेली अस्वस्थता दाखवत दिग्दर्शकाने ती बाजूही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे आपली मुलगी व्यवस्थित व्हावी यासाठी रुग्णालयातच दिवस रात्र काढणारे निर्भयाचे आई-वडीलही दाखवण्यात आले आहेत. पण इथे सर्व लक्ष पोलिसांवरच देण्यात आलं आहे.

निर्भया प्रकरण किती क्रूर होतं हे सर्वांनाच माहिती आहे. पण दिग्दर्शकाने ती क्रूरता पडद्यावर दाखवणं टाळलं आहे. ते प्रसंग दाखवत प्रेक्षकांना आकर्षित करणं दिग्दर्शकाला सोपं गेलं असतं, पण ते टाळण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. शक्य तितका भडकपणा टाळण्यात आल्याने अंगावर येणारे प्रसंग पाहताना डोळे बंद करण्याची गरज वाटत नाही. पण सर्वात महत्त्वाची आणि जमेची बाजू ठरली आहे ती म्हणजे अभिनय. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेली भूमिका अगदी योग्य पद्धतीने वठवली आहे. नेहमी पोलिसांना एकाच चष्म्यातून पाहणाऱ्यांना ही वेब सीरिज थोडा विचार करायला लावते एवढं मात्र नक्की.

अभिनेते : शेफाली शाह, राजेश तैलंग, रसिका दुग्गल
निर्माती – रिची मेहता
रेटिंग : 4/5

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix web series delhi crime nirbhaya case from delhi police view