Dhanashree Verma New Song: भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल व धनश्री वर्माचा घटस्फोट झाला आहे. २० मार्चला दोघांच्या घटस्फोटाची सुनावणी झाली. २०२०मध्ये चहल व धनश्रीचं लग्न झालं होतं. पण अवघ्या साडेचार वर्षात दोघांचा संसार मोडला. घटस्फोट होताच धनश्री वर्माचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे; ज्याची सध्या चर्चा सुरू आहे. दोघांच्या सद्य परिस्थितीवर हे गाणं आधारित आहे की काय? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. तिच्या नव्या गाण्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
घटस्फोटाच्या सुनावणी दिवशीच धनश्री वर्माचं नवीन गाणं प्रदर्शित झालं. ‘देखा जी देखा मैंने’ असं गाण्याचं नाव असून २४ तासांत १३ लाखांहून अधिक जणांनी हे गाणं पाहिलं आहे. या गाण्यामध्ये धनश्रीसह ‘पाताल लोक’ फेम इश्वाक सिंह प्रमुख भूमिकेत झळकला आहे. या गाण्यात फसवणूक, शारीरिक हिंसा, संशय घेणारा धनश्रीचा पती दाखवण्यात आला आहे. अशा या टॉक्सिक रिलेशनशिपचा सामना करताना धनश्री दिसत आहे. त्यामुळे “धनश्रीचं हे गाणं चहलसाठी आहे”, “धनश्री व चहल नात्यांमध्येही असं काहीस घडलं आहे”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया युट्यूबवर उमटल्या आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिलं, “पीआर टीमचा जबरदस्त मास्टरस्ट्रोक आहे. कोर्टाने घटस्फोटाची अंतिम सुनावणी दिली आणि त्याच दिवशी गाणं प्रदर्शित केलं.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, गाणं प्रदर्शित करण्यासाठी योग्य दिवस आणि वेळ निवडली. तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तिने अप्रत्यक्षरित्या घटस्फोट होण्याचं कारण फसवणूक, शारिरीक हिंसा, संशय असल्याचं उघड केलं आहे का?” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “चहलने धनश्रीला अशा पद्धतीने फसवलं.” अशाप्रकारच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
लॉकडाऊनमध्ये चहल-धनश्री पडले प्रेमात अन् मग….
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये धनश्री व चहलची व्हर्च्युअली पद्धतीने भेट झाली होती. यावेळी चहलने धनश्रीचा ऑनलाइन डान्स क्लासमध्ये सहभाग घेतला होता आणि मग चहलची धनश्री डान्स गुरू झाली. तेव्हाच दोघांची ओळख झाली. त्यानंतर काही काळाने धनश्री व चहल एकमेकांच्या प्रेमात पडले. एकेदिवशी चहलने धनश्रीला डेटवर बोलावून तिच्यासमोर प्रेम व्यक्त केलं होतं. २०२०मधील आयपीएलला जाण्याआधी चहलने धनश्रीबरोबर साखरपुडा उरकला. या सारखपुड्याचे फोटो शेअर करून दोघांनी सर्वांना सुखद धक्का दिला होता.
८ ऑगस्टला धनश्री व चहलचा साखरपुडा झाला होता. आयपीएलवरून परतल्यानंतर २२ डिसेंबर २०२०मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले. मोठ्या थाटामाटात धनश्री व चहलचं लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघं सतत एकत्र दिसायचे. तसंच सोशल मीडियावर एकत्र रील व्हिडीओ करायचे. पण, २०२३मध्ये धनश्री व चहलच्या नात्यात तेढ निर्माण होतं असल्याचं समोर आलं. यावेळी दोघं विभक्त होण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, तेव्हा ही अफवा असल्याचं दोघांनी सांगितलं. अखेर २० मार्च २०२५ धनश्री वर्मा व युजवेंद्र चहलचा घटस्फोट झाला.