नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अमेरिकन टीव्ही शो ‘फ्रेंड्स’मध्ये चँडलरची भूमिका साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन झाल्याचे वृत्त २९ ऑक्टोबर रोजी समोर आले. त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लास वेगास येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह घरातील हॉट टबमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळून आला असल्याचं समोर आलं.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार मॅथ्यू यांच्या शरीरात नैराश्यावर घेतल्या जाणाऱ्या ड्रग्ज आढाळल्या चे स्पष्ट झाले आहे. ‘फ्रेंड्स’ या सीरिजचे व मॅथ्यू यांचे चाहते यांच्यावर शोककळा पसरली. सोशल मीडियावर चाहते त्यांच्याबद्दल भरभरून व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच काही नेटकऱ्यांना मॅथ्यू यांच्या मृत्यूमुळे बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची आठवण झाली आहे.
आणखी वाचा : लोकांना खळखळून हसवणाऱ्या ‘चँडलर’चं आयुष्य दारू व ड्रग्सपायी झालेलं उद्ध्वस्त; अभिनेत्यानेच केलेला खुलासा
काही लोकांनी त्या कटू आठवणी शेअर करत या दोन कलाकारांच्या मृत्यूमधील साम्यसुद्धा सोशल मीडियावर शेअर केलं आहे. श्रीदेवी यांचाही असाच बाथटबमध्ये अपघाती मृत्यू झाला होता. एका ट्विटर युझरने लिहिलं, “फ्रेंड्स स्टार मॅथ्यू पेरी आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी या दोघांचा मृत्यू हा बाथटबमध्येच झाला, दोन्ही घटना शनिवारी स्थानिक वेळातच घडल्या आहेत. दोन्ही कलाकारांचा ५४ वर्षांचे असतानाच मृत्यू झाला.”
सारखाच दिवस, सारखेच वय आणि मृत्यू ओढवण्याची पद्धतही तीच यामुळे बऱ्याच लोकांना धक्काच बसला आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईमध्ये बाथटबमध्ये बुडल्याने झाला. श्रीदेवी आणि मॅथ्यू पेरी या दोघांनी मनोरंजन विश्वावर आपला ठसा उमटवला आहे. दोघांचाही मृत्यू रसिकांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाणाराच ठरला.