सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. नुकताचा त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात गेले काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास केला होता, त्यासाठी ओपनहायमर संस्कृत शिकले होते.
चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख दोन ठिकाणी आला आहे, पण त्यातील एका ठिकाणी आलेला उल्लेख यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारा सिलियन मर्फी आणि चित्रपटातील अभिनेत्री यांच्यात चित्रित झालेल्या सेक्स सीनदरम्यान सिलियन मर्फी म्हणजेच ओपनहायमर हे भगवद्गीतेचं वाचन करताना दाखवण्यात आलं आहे.
आणखी वाचा : Oppenheimer Review : अणूबॉम्बच्या जनकाचा विचित्र पण तितकाच चित्तथरारक अन् खिळवून ठेवणारा प्रवास…
याआधी चित्रपटात हा एक न्यूड सीन होता, पण नंतर काही प्रमाणात हा सीन कट करून तो दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये अभिनेत्री टॉपलेस आणि आणि तिने संमोर भगवद्गीता धरली असून अभिनेता सिलियन मर्फी त्यातील श्लोकाचा अर्थ तिला सांगताना सेक्स करत आहे अशाप्रकारचे दृश्य चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हे पाहताच नेटकऱ्यांनी यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे.
बऱ्याच लोकांनी याबद्दल ट्वीट करत त्यांचा विरोध दर्शवला आहे. आपल्या सर्टिफिकेशन बोर्डावरही लोकांनी ताशेरे ओढले असून सेन्सॉरने असे सीन्स पास कसे केले असा सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. एवढा वादग्रस्त सीनबद्दल कुणीच आक्षेप घेतला नसल्याने बऱ्याच लोकांनी यासाठी सेन्सॉर बोर्डाला जवाबदार धरलं आहे, शिवाय सेन्सॉर बोर्डवरील लोकांना याची लाज कशी वाटली नाही अशा शब्दात लोकांनी त्यांचा विरोध नोंदवला आहे.
या चित्रपटाला पाहिल्याच दिवशी भारतात उत्तम प्रतिसाद मिळाला असून सर्व स्तरातून याचं कौतुक होत आहे. आता मात्र या एका सीनमुळे निर्माण झालेला हा वाद वेळीच मिटणार की आणखी चिघळणार ते येत्या काही दिवसांत आपल्या समोर येईलच. नोलनच्या या बहुचर्चित चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.