कितने आदमी थे .. म्हणत चाबूक फटकारून दरारा निर्माण करणाऱ्या गब्बरला जणू आपण बाजूला उभे राहून बघतोय. जयचा सिक्का खोटा आहे हे कळल्यावर वीरूला गदागदा हलवून सांगायची इच्छा होईल की अरे, नीट डोळे उघडून बघ तो खोटे सांगतो आहे. सलीम-जावेद जोडीने लिहिलेल्या ‘शोले’ नावाच्या ऐतिहासिक आणि काल्पनिक फिल्मी विश्वात शिरायची संधी म्हणजे आपण त्या कथेतलेच एक पात्र म्हणून जे घडते आहे ते याचि देही याचि डोळा अनुभवण्याची जादू थ्रीडी नावाच्या तंत्रविष्काराने आपल्याला मिळाली आहे. मात्र, हा थ्रीडी करिश्मा साधण्यासाठी तीन तासांच्या ऐतिहासिक बॉलिवूडी ‘शोले’च्या अडीच लाखांच्यावर फ्रेम्स तंत्रज्ञांना तयार कराव्या लागल्या आहेत.
‘शोले’ चित्रपटाची जादू चिरंतन आहे. पण आजच्या काळात या चित्रपटाचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर तो थ्रीडीत रूपांतरित व्हायला हवा, ही निर्मात्यांची इच्छा होती. आणि त्यांच्या विचारात तथ्य होते पण, तीन तासांचा शोलेसारखा भव्य चित्रपट थ्रीडी रूपांतर करणे हे सोपे काम नव्हते, असे ‘शोले’ची थ्रीडी करामत साधणाऱ्या ‘माया डिजिटल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘शोले’ हा पूर्णत: तीन तासांचा चित्रपट आहे. थ्रीडी रूपांतरण करण्यासाठी एका सेकंदाचे फूटेज रुपांतरित करायचे तर त्याच्या २४ फ्रेम्स कराव्या लागतात. हे गणित लक्षात घेतले तर संपूर्ण ‘शोले’ थ्रीडी करण्यासाठी एकूण २,८५,१२० फ्रेम्स तयार कराव्या लागल्या आणि हे सगळे करण्यासाठी गेले वर्षभर आमची अडीचशेजणांची टीम यावर काम करत होती, अशी माहितीही मेहता यांनी दिली.
‘शोले’ चित्रपटातील एकेक दृश्य हे खास लक्षात ठेवावे असे आहे. पण, ‘शोले’च्या काल्पनिक विश्वातील गंमत अनुभवता यावी यासाठी थ्रीडी करताना सगळ्यात अवघड काय वाटले असेल तर ती म्हणजे चित्रपटातील गाणी असे मेहता यांचे म्हणणे आहे. याबाबतीतही, ‘शोले थ्रीडी’चे वेगळेपण वैश्विक आहे. त्याचे कारण म्हणजे हॉलिवूडमधले थ्रीडीपट हे कित्येकदा थरारपट, साय-फाय चित्रपट किंवा हॉररपट असतात. त्यात गाण्यांचा संबंध कुठेही येत नाही. हिंदी चित्रपटाचा थ्रीडीच्या दृष्टीने विचार करायचे झाले तरीही गाणी-संगीत हा चित्रपटाच्या कथानकाचा आत्माच असल्याने त्यांना वगळून टाकणे अशक्यच आहे. पण, ही गाणी थ्रीडी रुपांतर करण्याचा भाग हा अधिक गंमतीशीर आणि आव्हानात्मक होता, असे मेहता यांनी सांगितले. ‘शोले’मधली सगळीच गाणी लोकप्रिय आहेत पण, होळीचे गाणे थ्रीडी करताना जास्त मजा आली, असे ते सांगतात. होळीच्या गाण्यात सगळीकडे गुलालाचा रंग उधळलेला दिसतो. हा गुलाल थ्रीडीमध्ये आपल्याच अंगावर जणू उधळला जातो आहे, अशी जाणीव होते. ते दृश्य करताना छान अनुभव आल्याचे ते सांगतात. ‘शोले’ थ्रीडी करण्यासाठी एकूण २५ कोटी खर्च आला आहे. थ्रीडी हे मनोरंजन विश्वाचे भविष्यच आहे त्यामुळे बॉलिवूडने अधिकाधिक थ्रीडी चित्रपटांच्या निर्मितीवर भर देण्याची गरजही मेहता यांनी व्यक्त केली.
२५,०२,८५,००० फ्रेम्सचा शोले थ्रीडी
कितने आदमी थे .. म्हणत चाबूक फटकारून दरारा निर्माण करणाऱ्या गब्बरला जणू आपण बाजूला उभे राहून बघतोय. जयचा सिक्का खोटा आहे हे कळल्यावर वीरूला गदागदा हलवून सांगायची इच्छा होईल की
First published on: 21-11-2013 at 08:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New 3d sholay made in 25028500 frames