एकाचवेळी ओळीने वेगवेगळ्या माध्यमातील तीन कलाकृतींमुळे चर्चेत राहण्याची संधी कलाकारांना फार कमी वेळा येते. सध्या असा त्रिवेणी योग प्रसिध्द अभिनेते आशुतोष राणा यांच्या बाबतीत जुळून आला. २२ वर्षांनी रंगभूमीवर ‘हमारे राम’ या नाटकात रावणाची भूमिका आशुतोष करत आहेत. त्यांचे हे नाटक सध्या देशभर लोकप्रिय झाले आहे. गेल्या आठवड्यात त्यांचा ‘लवयापा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यातही त्यांची महत्वाची भूमिका आहे. तर या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटात ते हंबीरमामांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा योग जुळून आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केलाच, मात्र आज रंगभूमीबाबत तरुण प्रेक्षक सजग झाला आहे. नाटकाच्या माध्यमातून नवीन प्रेक्षकवर्ग निर्माण होतो आहे ही गोष्ट अधिक महत्वाची आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हमारे राम’ या नाटकात आशुतोष राणा यांनी साकारलेली रावणाची भूमिका अत्यंत गाजते आहे. ‘रामायणाची कथा आणि त्यातील सगळी पात्रं, त्यातून मांडलेले विचार हे सगळंच कालजयी आहे. रामायणाची कथा घरोघरी ऐकली जाते, वाचली जाते आणि तरीही त्यावर आधारित नाटकाला इतका प्रतिसाद मिळतो आहे की गेल्या काही महिन्यांत देशभरात या नाटकाचे १६० प्रयोग झाले आहेत आणि १६ ते २३ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये या नाटकाचे प्रयोग रंगणार आहेत. २२ वर्षांनी रंगभूमीवर केलेल्या कामाबद्दलचा हा अनुभव खूप आनंददायी आहे’ अशी भावना आशुतोष राणा यांनी व्यक्त केली. एनएसडीमध्ये त्यांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. त्यामुळे रंगभूमीवरच कलाकार म्हणून आपली जडणघडण झाली आहे, असं सांगतानाच दोन दशकांपूर्वी विजयाबाई मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली ‘पुरूष’ हे नाटक केलं होतं. त्यानंतर रंगभूमीवर काम करायची खूप इच्छा होती, मात्र मनासारखं नाटक मिळायला हवं हा एकच निकष होता. आज इतक्या वर्षांनंतर ‘हमारे राम’ सारख्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली आहे, असं राणा यांनी सांगितलं.

रामायणातील अपरिचित पैलू वा वारंवार उपस्थित केेले जाणारे मुद्दे, प्रसंग लक्षात घेऊन त्याची मांडणी अनोख्या पध्दतीने या नाटकात करण्यात आली असून पहिल्यांदाच त्यासाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग रंगमंचावर करण्यात आला आहे. कुठल्याही कला सादरीकरणात तंत्रज्ञानाची भूमिका काळानुसार बदलत जाते. पूर्वी ध्वनीक्षेपक नव्हते तेव्हा नाट्यगृहात शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचायला हवा म्हणून संहितेत दोन व्यक्ती एकमेकांमध्ये कुजबूज करत आहेत असं म्हटलं असलं तरी रंगमंचावर ती कुजबूज अगदी मोठ्यानेच ऐकवायला लागायची. पुढे ध्वनीक्षेपक आणि अन्य तंत्रज्ञानामुळे नाट्य सादरीकरणातही सफाईदारपणा आला, असं सांगतानाच तंत्रज्ञान आणि कलेचं नातं हे शरीर – आत्म्यासारखं आहे, असा विचार त्यांनी मांडला. नुसतंच तंत्रज्ञान असेल, पण तुमच्या सादरीकरणात अभिनयाचा आत्माच नसेल तर त्याचा काय उपयोग… त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग हा सादरीकरण अधिक उठावदार करण्यापुरता मर्यादित असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

नाटक हे जोडून घेण्याची आणि संवादाचीही संधी देतं… सध्या मराठी, हिंदी, गुजराती रंगभूमीवर नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, यामागचं कारण स्पष्ट करताना नाटक हे प्रेक्षकाला रंगमंचावर जे नाट्य सुरू आहे त्याच्याशी स्वत:ला जोडून घेण्याची आणि त्याबाबतीत मनमोकळा संवाद करण्याचीही संधी देतं. चित्रपट किंवा वेबमालिकेतील कथानकाशी तुम्ही जोडले जाता, मात्र ते कसं वाटतं आहे याबाबतीत तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही. आजची पिढी समाजमाध्यमांचा उपयोग करणारी आहे. तिथे तुम्हाला इतरांशी जोडलं जाऊन संवाद साधता येतो, तसाच आनंद सध्या नाटकाच्या बाबतीतही मिळत असल्याने प्रेक्षक नाटकांकडे वळले आहेत. ‘हमारे राम’सारख्या नव्या नाटकांनी नवीन तरुण प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे ज्याची आज सर्वाधिक गरज आहे, असं मत आशुतोष राणा यांनी व्यक्त केलं.