गायत्री हसबनीस
‘बॅटमॅन’ हा बहुचर्चित हॉलीवूड सुपरहिरोपट टाळेबंदीमुळे रखडल्यानंतर अखेर ४ मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला. आज एक महिना उलटून गेला तरी हा चित्रपट अद्यापही तिकीटबारीवर धुमाकूळ घालतो आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने जगभरातून ६०० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली असून भारतातही या चित्रपटाने मोठा डंका वाजवला आहे. एकंदरीतच या चित्रपटाबद्दल अनेक कथा आणि चर्चानी जोर धरला आहे. त्यातीलच काही सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या घटनांची ही एक उजळणी..
‘बॅटमॅन’.. या काल्पनिक पात्राबद्दल सांगायचे झाले तर काळानुसार एकच व्यक्तिरेखा नव्याने बदलत जाते, पण त्याची लोकप्रियता अंशत:ही कमी होत नाही जे हॉलीवूडमध्ये सुपरहिरो या संकल्पनेच्या बाबतीत आत्तापर्यंत घडत आले आहे. ‘बॅटमॅन’ही त्याला अपवाद ठरलेला नाही. ‘बॅटमॅन’च्या चित्रपटमालिकांचा अर्थकारणाचा आलेखही कायम चढता राहिलेला असून अनेकांना या चित्रपट मालिकांनी आर्थिक सुबत्ताही मिळवून दिली आहे. योग्य विपणन आणि पुरेपूर प्रसिद्धीच्या जोरावर बॅटमॅन यशस्वी ठरला आहे. ‘सुपरमॅन व्हर्सेस बॅटमॅन’नंतर २०२२ साली ‘डीसी’ आणि ‘वॉर्नर ब्रदर्स’चे बिग बजेट चित्रपट करण्याचे ठरले तेव्हा अनेक स्थित्यंरानंतर, बदलानंतर हा चित्रपट घडला आणि प्रदर्शित झाला. धाटणी तीच, पण वेगळी कथा, नेहमीचीच पात्रे आणि नवी रहस्ये तसेच रॉबर्ट पॅटिनसन या नव्या चेहऱ्याला बॅटमॅनच्या भूमिकेत घेऊन शेवटी चित्रपट साकार झाला. एक चित्रपट आकार घेत असतो, तेव्हा अनेक बदल, वळणे, अडचणीत टाकणारे निर्णय या सगळय़ांतून तो जात असतो. बॅटमॅनच्या नव्या चित्रपटात बॅटमॅन कोण इथपासून ते दिग्दर्शकात झालेला बदल, पात्रांमध्ये केलेले बदल, अगदी कथेतही आयत्या वेळी केलेले बदल यामुळे हा चित्रपट कायमच चर्चेत राहिला.
बॅटमॅनच्या निर्मात्यांवर हॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉकचा प्रभाव आहे, या चर्चेला पाच वर्षांपूर्वी जोरदार सुरुवात झाली. त्याचं कारण २०२२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘बॅटमॅन’ या चित्रपटाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले होते. तेव्हा या चित्रपटासाठी दिग्दर्शक बदलण्याचा सिलसिला सुरू होता. अखेर जेव्हा मॅट रिव्स हा चित्रपट दिग्दर्शित करणार असे निश्चित झाले , त्या वेळी त्यांनी जाहीरपणे आल्फ्रेड हिचकॉकच्या दिग्दर्शन शैलीवरून प्रेरणा घेत बॅटमॅन साकारायचा असल्याचे सांगितले होते. आपण स्वत: हिचकॉक यांचे चाहते आहोत, तेव्हा त्याच्या रहस्यमय थरारशैलीतून प्रेरणा घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. गोथम शहराला वाचवण्यासाठी रिड्लरसारख्या क्रूर खुन्यापासून बॅटमॅन जनतेला वाचवतो खरा.. पण रिड्लरसारख्या आत्मघाती मनोवृत्तीच्या केविलवाण्या व्यक्तीची कहाणी हिचकॉक यांच्या प्रभावातून आल्याचे समोर येते. सहानुभूती हा निर्देशांक आपल्या चित्रपटांच्या विषयात हमखास आणणे हे कौशल्य खरं तर हिचकॉक यांचे.. मॅट रिव्स यांनी बॅटमॅनमध्ये त्याचाच उपयोग करून घेतला असल्याचे कबूल केले आहे.
लपलेला तो जोकर कोण?
जोकर या पात्राची ओळख बिल फिंगर यांनी करून दिली. १९२० च्या काळात आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर बनवलेले जोकरचे पहिले स्केच नव्या प्रकारे जॅरी रॉबिनसन यांच्याकडून काढून घेतले गेले. शंभर वर्षांहूनही अधिक काळ जोकर या नावाने प्रसिद्ध असलेले हे पात्र शंभर वर्षांनंतर म्हणजे २०२२ मध्ये आलेल्या बॅटमॅनमध्ये दिसले नाही, हा प्रश्न अधोरेखित केला गेला. हे पात्र वगळले जाणार नाही याची शाश्वती प्रेक्षकांनाही आहेच; परंतु कशावरही टीकाटिप्पणी करायच्या आधी प्रकरण नेमकं काय आहे याचा तपासही चित्रपटकर्मीनी केला. ‘बॅटमॅन २०२२’मध्ये रिड्लर हे पात्र खलभूमिकेत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता पॉल डॅनो यांनी रिड्लरचे पात्र साकारले आहे. संपूर्ण चित्रपटात जोकरचे दर्शन न झाल्याने त्याला उपहासाने नव्या बॅटमॅनचा नवा जोकर असे संबोधले गेले. दिग्दर्शक मॅट रिव्स यांनी मात्र यावर गौप्यस्फोट केला, त्यांनी चित्रपटातून बाद केलेला जोकरचा सीन प्रसिद्ध केला आणि सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. त्यात चित्रपटाच्या शेवटी अर्कमच्या तुरुंगवासात म्हणजे अर्कम स्टेट हॉस्पिटलमध्ये बॅटमॅन कोणाशी तरी बोलतो आहे असे दृश्य दाखविण्यात आले आहे तेव्हा तो आहे तरी कोण? याची खात्री पटली आणि तो जोकर असल्याचे सिद्ध झाल्यावर बॅरी किओगन या लोकप्रिय आयरिश अभिनेत्याने जोकरचे पात्र साकार केले असल्याने स्पष्ट झाले. या सगळय़ा मामल्यावर अनेक चाहते आणि चित्रपट जाणकार यांच्यात चर्चा रंगल्या. जोकरची लोकप्रिय व्यक्तिरेखा नव्या बॅटमॅनपटातून गायब करायचे आणि मग त्याचा समावेश चित्रपटात होता असे पिल्लू सोडून चाहत्यांचा जो गोंधळ केला गेला त्याबद्दल प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर उमटला आहे. किमान आता समोर आलेले हे जोकरचे पात्र आगामी बॅटमॅनपटात असेल का, याबद्दल सत्य माहिती असूनही चाहत्यांची अपेक्षा, उत्सुकता कायम आहे. यातच त्या त्या व्यक्तिरेखांची चित्रपटांपलीकडची लोकप्रियता लक्षात येते.
रॉबर्ट पॅटिनसनने साकारलेला पहिला बॅटमॅन ‘ट्वायलाइट सागा’ या लोकप्रिय प्रेमकथेमुळे रॉबर्ट पॅटिनसन हे नाव प्रचंड चर्चिले गेले. ‘ट्वायलाइट’च्या वेळेस सहअभिनेत्री क्रिस्टन स्टेवर्डसह कित्येक वर्षे नाव जोडले गेल्याने त्यांच्या अफेअरच्या चर्चाही हॉलीवूडमध्ये सुरू होत्या. ‘हॅरी पॉटर’, ‘ट्वायलाइट’, ‘रिमेंबर मी’ आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘टेनेट’ या चित्रपटांनी वेगळी ओळख रॉबर्टला मिळवून दिली. ‘बॅटमॅन’ या चित्रपटातील भूमिकेसाठीही त्याचे कौतुक झाले. ब्रुस वेन म्हणजेच बॅटमॅनला रॉबर्ट पॅटिनसनमध्ये पाहिले ते मॅट रिव्स यांनीच. ‘गुड टाइम’ या चित्रपटातील रॉबर्ट पॅटिनसनचे काम त्यांनी पाहिले होते, शिवाय बॅटमॅन म्हणून त्यांना एक तरुण कलाकार हवा असल्याने २०१९ साली पॅटिनसनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. अर्थात, सध्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता मॅट यांनी शोधलेला हा नवा बॅटमॅन प्रेक्षकांनीही आपलासा केला आहे, हे मात्र खरे.
बेन अॅफ्लेकचा चक्क नकार
‘सुपरमॅन व्हर्सेस बॅटमॅन’, ‘जस्टीस लीग’मध्ये साकारलेला बेन अॅफ्लेक यांचा बॅटमॅन प्रचंड गाजला. त्यामुळे आगामी चित्रपटातही तोच बॅटमॅन म्हणून दिसेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. बेन स्वत: लेखक – दिग्दर्शकही आहे. त्यामुळे नव्या बॅटमॅनची सूत्रे त्यांच्याकडे आल्याचे वृत्त समजतानाच त्यांनी कथालेखनाची प्रक्रियाही सुरू केली. गोष्टी पुढे सरकत गेल्या; पण अचानक बेन अॅफ्लेकने चित्रपट दिग्दर्शित करण्यास नकार दिला. त्यांना अभिनय आणि निर्मिती करण्याचीही इच्छा होतीच, परंतु दिग्दर्शक म्हणून मॅट रिव्सची नियुक्ती झाल्यानंतर बेन अॅफ्लेक यातून बाहेर पडले. बेन अॅफ्लेक यांनी आपला मित्र अभिनेता मॅट डिमॉन याच्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे कबूल केले. आपल्याला अनेक वेगवेगळे अनुभव ‘जस्टीस लीग’च्या दरम्यान आल्याने काही गोष्टी फारशा उत्साही वाटल्या नाहीत. म्हणून त्यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे स्पष्ट केले.
या सगळय़ा गोंधळात बॅटमॅन पुन्हा पडद्यावर येणार की नाही, यावरच प्रश्नचिन्ह उमटले होते. मधला काळ करोनाचाही होता; पण सगळे अडथळे पार करून नव्या लेखन-दिग्दर्शन आणि नव्या बॅटमॅनसह चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. चित्रपटाने केलेली कोटय़वधी डॉलर्सची कमाई पाहता बॅटमॅनवरचे चाहत्यांचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही हेच पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.