बॉलिवूडमध्ये एकीकडे कतरिना आणि रणबीर या जोडीचे ‘चुप-चुपके’ अफेअर सुरू असताना आणखी एका जोडप्याने या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या प्रेमकथेला आकार द्यायला सुरुवात के ली आहे. भन्साळींचा ‘राम’ रणवीर सिंग आणि ‘लीला’ दीपिका पदुकोण यांची पडद्याबाहेरची केमिस्ट्री अफलातून रंगात आली आहे. दीपिकानेही चुपके-चुपके आपला वाढदिवस रणवीरबरोबर न्यूर्याकमध्ये साजरा केला. न्यूयॉर्कमधील त्यांची छायाचित्रे सोशल नेटवर्क साईट्सवर फिरत असल्याने या ‘राम-लीला’ जोडीबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
‘राम-लीला’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आलेल्या दीपिका आणि रणवीर यांच्यातले मैत्रीचे नाते चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेमापर्यंत पोहोचले होते. चित्रिकरणादरम्यान, दुबईच्या पार्टीतील त्यांची छायाचित्रेच त्यांच्या प्रेमाची कहाणी सांगत होती. पण, सध्या कारकिर्दीच्या शिखरावर असलेल्या दीपिकाने या अफे अरला चर्चेचे रूप येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. एकीकडे दीपिका सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून स्थान पटकावून असताना रणवीरची आत्ता कुठे सुरुवात होते आहे. त्यामुळे रणवीरचा स्वभाव इतरांपेक्षा खूपच वेगळा आहे आणि त्यामुळे त्याच्याबरोबर वेळ व्यतीत करायला आवडतो, अशी गोलमाल उत्तरे देऊन दीपिकाने या चर्चाना पूर्णविराम द्यायचा प्रयत्न केला होता. पण, आता चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठीही तिने रणवीरचीच ‘कंपनी’ स्वीकारल्याने या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.
वाढदिवसाच्या आधी दीपिकाकडून गेल्यावर्षीच्या सुपरडुपर यशासाठी तिच्या बॉलिवूडमधील सहकाऱ्यांनी चांगली पार्टी घेतली. नववर्षांचे स्वागत आणि यश आपल्या सहकाऱ्यांबरोबर साजरा केल्यानंतर दीपिका रणवीरबरोबर वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचली. रणवीरसोबत असल्याने दीपिकाने तिथे चाहत्यांबरोबर फारशी छायाचित्रे काढून घेतली नाहीत. रणवीरने मात्र आपल्या चाहत्यांबरोबर अनेक छायाचित्रे काढून घेतली. यातलीच काही छायाचित्रे सोशल नेटवर्क  साईट्सवर आल्याने त्यांची प्रेमकहाणी नव्याने समोर आली आहे. दीपिकाने या प्रेमप्रकरणाबद्दल चुप्पी साधली असली तरी बोलघेवडय़ा रणवीरला ही गोष्ट दडपून ठेवणे कठीण होते आहे. पण, आता ग्लॅमरबरोबर येणाऱ्या साऱ्या बऱ्यावाईट गोष्टींनी दीपिका सरावली असल्याने रणबीर-कतरिनाच्या तालावर तिलाही आपल्या प्रेमाबद्दल तळ्यात-मळ्यात गोष्टी करणे फारसे अवघड जाणार नाही.

Story img Loader