तिग्मांशु धूलियाचा ‘बुलेट राजा’ हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे. या चित्रपटाबरोबर माधुरी दीक्षितचा अभिनय अलेल्या ‘देढ इश्किया’ चित्रपटाचा नवा कोरा ट्रेलर दाखविण्यात येणार आहे.
गेल्या शुक्रवारी यूट्युबवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, त्याला १२ लाख हिट्स मिळाले आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून आणि चित्रपटाची थोडी अधिक माहिती प्रेक्षकांना मिळावी म्हणून ‘विशाल भारद्वाज पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘शेमारू एन्टरटेन्मेंट’ चित्रपटाच्या नवीन ट्रेलरवर काम करीत असून, हा ट्रेलर ‘बुलेट राजा’ चित्रपटाबरोबर चित्रपटगृहात दाखविण्यात येईल.
पहिल्या ट्रेलरमध्ये खालुजान (नसिरुद्दीन शाह) आणि बब्बनचे संभाषण द्खविण्यात आले आहे. ज्यात तो प्रेमाच्या सात पायऱ्यांचे वर्णन करताना दिसतो. चित्रपटाच्या या नव्या ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षित आणि हुमा कुरेशी या स्त्री व्यक्तीरेखांवर भर देण्यात आला आहे.
अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘इश्किया’ चित्रपटाचा हा सिक्वल म्हणजे खालुजान आणि बब्बनची दोन सुंदर आणि तेव्हढ्याच खतरनाक स्त्रियांबरोबरची धाडसी प्रेमकथा आहे.
‘देढ इश्किया’मध्ये माधुरी बोगम पाराची भूमिका करीत असून, हुमा कुरेशी मुन्नियाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Story img Loader