दिग्दर्शनाचे बाळकडू घरातून लाभलेला आजच्या पिढीचा युवा दिग्दर्शक म्हणजे आदित्य सरपोतदार. मोजक्या पण दर्जेदार सिनेमांनी त्यांनी अल्पावधीत रसिकांची मने जिंकली आहेत. वडील अजय विश्वास सरपोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली आणि आज त्यांच्या पश्चात ती योग्यरीत्या वलयांकित देखील केली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘उलाढाल’, ‘सतरंगी रे’, ‘नारबाची वाडी’ आणि आता प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ‘क्लासमेट्स’ चित्रपटाचा लूक पाहिला तर आपल्या लक्षात येईल सिनेमाचा कथाविषय, मांडणी, टेक्निकल परफेक्शन, कलाकारांची निवड हे सर्वच घटक प्रेक्षकांच्या अभिरुचीचा विचार करून तरुणाईला आकर्षित करतील अशा रितीने सुनियोजित केले आहेत.
बॉलीवूड प्रमाणे मराठीतही युथफुल सिनेमांची निर्मिती व्हावी या उद्देशाने त्यांनी आपल्या सिनेमात तरुणाईचे विविध रंग रेखाटले. ‘उलाढाल’ मध्ये ढालीचा ऐतिहासिक संघर्ष होता, तर ‘सतरंगी’ मध्ये आजच्या तरुणाईचे करिअर, वडील- मुलांचे ट्युनिंग या विषयीचा वेध घेण्यात आला होता. ‘नारबाची वाडी’ चित्रपटात कोकणातल्या वाडीत घडणारी जमीनदार आणि शेतकऱ्याची कथा होती. ज्यात आजोबा आणि नातू यांच्यातील नातेसंबंधही रेखाटण्यात आले होते. या प्रत्येक सिनेमातून दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी शहरी आणि ग्रामीण तरुणांचा चेहरा आपल्यासमोर मांडला. याच पार्श्वभूमीवर १६ जानेवारीला प्रदर्शित होत असलेला ‘क्लासमेट्स’ हा आजच्या तरुणाईचा सिनेमा आहे. अंकुश चौधरी, सचित पाटील, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सिद्धार्थ चांदेकर, सुयश टिळक, पल्लवी पाटील, संजय मोने, किशोरी शहाणे आणि रमेश देव अशी तगडी फौज या सिनेमात एकत्र आली आहे. दमदार कलाकारांची खिळवून ठेवणारी अदाकारी सोबत तरुणाईची अनोखी झिंग यात अनुभवता येणार आहे. ‘म्हाळसा एंटरटेनमेन्ट’ निर्मिती संस्थेचे सुरेश पै निर्मित ‘क्लासमेट्स’ चित्रपटाची सह निर्मिती मिडिया मॉन्क्स यांनी केली आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘क्लासमेट्स’चा ट्रेलर व यातील ‘तेरी मेरी यारीया’ व ‘बिनधास्त बेधडक’ ही गीते सध्या युट्युब व संगीत वाहिन्यावर विशेष गाजताहेत. ‘व्हिडीओ पॅलेस’ चे नानूभाई जयसिंघानी ‘एस. के. प्रॉडक्शन्स फिल्म’चे कोमल व संदीप केवलानी प्रस्तुत, ‘क्लासमेट्स’च्या संगीतासाठी अविनाश – विश्वजीत, अमितराज, पंकज पडघन व ट्रॉय – अरिफ या संगीतकारांनी खूप मेहनत घेतली आहे. ही गीते गुरु ठाकूर, मंदार चोळकर, क्षितीज पटवर्धन, विश्वजीत जोशी या गीतकारांनी तितक्याच तरलतेने लिहिली आहेत. क्षितीज पटवर्धन, समीर विध्वंस यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून संवाद क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेत. छायांकन – के. के. मनोज, कला दिग्दर्शक – मनोहर जाधव, वेशभूषा – मनाली जगताप, संकलन – इम्रान – फैझल, अँक्शन डिरेक्टर – मनोहर वर्मा अशी इतर श्रेयनामावली आहे.
तरुणाईशी संवाद साधणारा, मैत्री – प्रेमाच्या नव्या वाटा चोखंदळणारा ‘क्लासमेट्स’ प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा