मराठी नाटक, चित्रपट परदेशात पोहोचले. तिथल्या मराठी प्रेक्षकांनी आपल्या भाषेतील कलाकृतींना उदंड प्रतिसादही दिला आहे. आता त्यापुढचे पाऊल म्हणून अमेरिकेतच मराठी चित्रपटसृष्टी उभारण्याची धडपड प्रसिद्ध चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) या आपल्याच संस्थेच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्याची सुरुवात म्हणून २७-२८ जुलैदरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे पहिला मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मराठीतील नामवंत कलाकार मंडळी या महोत्सवासाठी खास उपस्थित राहणार आहेत. मात्र केवळ त्यांची भेट वा त्यांच्याशी संवाद हा या महोत्सवाचा मर्यादित उद्देश नाही. तर परदेशातील मराठी कलाकारांना तेथील त्यांचे विषय, त्यांच्या पद्धतीने चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून मांडण्याची संधी देणारा चित्रपट उद्योग उभारण्यासाठी हा संवादसेतू महत्त्वाचा ठरणार आहे, असे अभिजीत घोलप यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
आता थेट अमेरिकेत
मराठी चित्रपटसृष्टीचा प्रवास हा कोल्हापूर, पुणे करत करत मुंबईत येऊन स्थिरावला. आता हाच चित्रपट उद्योग अमेरिकेतील मराठी चित्रपटकर्मीना एकत्र आणत तिथेही सुरू करावा, असा विचार मनात आल्याचे घोलप यांनी सांगितले. अमेरिकेतील मराठी कलाकारांना एकत्र आणून तिथे स्वतंत्रपणे मराठी चित्रपट निर्मिती करण्यामागेही एक ठोस कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत परदेशातील मराठी प्रेक्षक हिंदी, मराठी सर्व प्रकारचे चित्रपट आवर्जून पाहतात, आवडला तर उचलून धरतात. मराठी चित्रपट असला तरी त्याचे विषय अनेकदा ग्रामीण महाराष्ट्रातले किंवा पुण्या-मुंबईसारख्या शहरात वाढलेल्या मराठीजनांशी निगडित असतात. गेली पाच-सहा दशके अमेरिकेतच राहात असलेल्या मराठी माणसांचे विषय, त्यांच्या समस्या, जीवनशैली सगळं वेगळं आहे. त्यांना त्यांचे विषय चित्रपटातून मांडता आले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या रोजच्या जगण्याशी ते जोडून घेता येतील. इथल्या मराठी लेखक, तंत्रज्ञ, कलाकारांना चित्रपट निर्मितीची संधी मिळेल असे काहीतरी केले पाहिजे, हा विचार अगदी ‘देऊळ’ चित्रपटाच्या निर्मितीपासून मनात घोळत होता, असे घोलप यांनी सांगितले.
अमेरिकेतील मराठी चित्रपट महोत्सव ही सुरुवात..
अमेरिकेत पहिल्यांदाच मराठी चित्रपट उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. ‘नाफा’च्या माध्यमातून अमेरिकेतील ५०० हून अधिक मराठी कलाकार, निर्माते, लेखक, तंत्रज्ञ एकत्र काम करत आहेत. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून दोन शॉर्ट फिल्म्सची निर्मितीही करण्यात आली आहे, अशी माहिती घोलप यांनी दिली. अमेरिकेत होणाऱ्या या भव्य चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून नामवंत मराठी कलाकार तिथे येतील. चर्चासत्रे, मास्टरक्लास अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दोन्हीकडच्या मराठी कलाकारांमध्ये संवाद घडून येईल. आणि म्हणूनच दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, अशोक व निवेदिता सराफ, अभिनेते व दिग्दर्शक सचिन व सुप्रिया पिळगांवकर, मृणाल कुलकर्णी, अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेता सुबोध भावे, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, संगीतकार-दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदी कलाकार मंडळी या चित्रपट महोत्सवास भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
दोन्हीकडच्या मराठी चित्रपटांची देवाणघेवाण
अमेरिकेत मराठी चित्रपट उद्योग सुरू झाला तर त्याचा फायदा दोन्हीकडच्या चित्रपटकर्मीना होईल, असे त्यांनी सांगितले. परदेशात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करायचे असेल तर येथे तंत्रज्ञ आणि साधनसामुग्री उपलब्ध असेल, चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळवणं सोपं होईल.
केवळ कलाकारांनी इथे येऊन चित्रीकरण केलं तर बराचसा खर्च वाचेल. आताही महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपटाचा जवळपास वीस-पंचवीस मिनिटांचा भाग अमेरिकेत चित्रित करण्यात आला आहे, असे सांगतानाच सध्या ओटीटीमुळे मराठी चित्रपटांचं विश्वही अधिक जवळ आलं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अमेरिकेत तयार झालेल्या मराठी चित्रपटांना ओटीटी कंपन्याचं व्यासपीठ मिळावं यासाठी सोनी लिव्ह, प्लॅनेट मराठीसारख्या वाहिन्यांची चर्चा सुरू आहे, असं अभिजीत घोलप यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, चित्रपट महोत्सवासाठी ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’शी करार झाला असून त्यानुसार अमेरिकेत चित्रित झालेल्या ‘निर्माल्य’ व ‘पायरव’ या दोन शॉर्ट फिल्म्स २०२५च्या पिफ महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. तर महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटाचा वल्र्ड प्रीमिअर अमेरिकेतील चित्रपट महोत्सवात करण्यात येणार आहे, असे सांगत दोन्हीकडच्या मराठी चित्रपटांसाठी ही देवाणघेवाण उपयुक्त ठरणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.