मिर्झापूर, द फॅमिली मॅन, मेड इन हेवन, पाताल लोक अशा लोकप्रिय आणि गाजलेल्या वेबसीरीजनंतर आता अ‍ॅमेझॉनने आपल्या प्रेक्षकांसाठी एक नवीन मेजवानी आणली आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम लवकरच एक नवा चित्रपट आणत आहे आणि विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीत असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅमेझॉन प्राईमचा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘पिकासो’  येत्या १९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतासह २४० इतर देशांतील अ‍ॅमेझॉनचे सदस्य हा चित्रपट पाहू शकतात. काय आहे हा चित्रपट, कोणकोणते कलाकार यात आपल्याला पाहायला मिळतील…चला पाहूया.

अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटाचा ट्रेलरही शेअर केला आहे. पिकासो या अ‍ॅमेझॉन प्राईमच्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याचं दिग्दर्शन आणि लेखन अभिजीत मोहन वारंग यांनी केलं असून सहलेखन तुषार परांजपे यांचं आहे. या चित्रपटात वडील आणि मुलाच्या नात्याचं चित्रण केलं आहे. या चित्रपटात कोकणातली जीवनशैली तसंच तिथली पारंपरिक कला दशावतार याची झलकही पाहायला मिळणार आहे.

एक कलाकार विद्यार्थी, त्याला स्कॉलरशीपवर परदेशात जाण्याची संधी मिळणं, पण त्याची परिस्थिती आडवी येणं अशा ठळक घटनांभोवती हा चित्रपट गुंफलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग हे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. चित्रपटात वास्तविकता आणण्यासाठी टीम प्रयत्नशील होती त्यामुळे प्रसंगानुरुप खऱी ठिकाणं निवडल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New first marathi movie of amazon prime video vsk