मराठी रंगभूमीवर सध्या सुरू असलेले ‘नांदी’ हे नाटक १०० प्रयोगानंतर थांबविण्यात येणार आहे. आत्तापर्यंत या नाटकाचे ४० हून अधिक प्रयोग झाले आहेत. १०० प्रयोगांचे लक्ष्य गाठल्यानंतर हे नाटक बंद करण्यात येणार आहे.
मराठीतील चार निर्मात्यांनी एकत्र येऊन या नाटकाची निर्मिती केली असून अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. स्वत: ऋषिकेश जोशी यांच्यासह नाटकात अविनाश नारकर, चिन्मय मांडलेकर, शरद पोंक्षे, प्रसाद ओक, स्पृहा जोशी, तेजस्विनी पंडित, सीमा देशमुख, अश्विनी एकबोटे, अजय पुरकर आदी कलाकार काम करत आहेत. मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या निवडक अशा दहा नाटकांमधील दहा प्रवेश आणि वेगळा असा अकरावा प्रवेश या नाटकाच्या माध्यमातून एकत्र गुंफण्यात आले आहेत. दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंद्रकांत लोकरे, संज्योत वैद्य या चार निर्मात्यांनी ‘नांदी’ सादर केले आहे. नाटकातील सर्वच कलाकार दूरदर्शन मालिका, अन्य नाटके आणि चित्रपट यात अत्यंत व्यस्त वेळापत्रक असणारे आहेत. मात्र तरीही त्या सर्वाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. नाटकातील कोणत्याही अभिनेत्याची ‘रिप्लेसमेंट न होता आत्तापर्यंतचे सर्व प्रयोग पार पडले असून १००व्या प्रयोगापर्यंत आहे त्याच मूळ संचात हे प्रयोग सादर केले जाणार आहेत. व्यस्त असणाऱ्या या सर्व कलाकारांनी प्रस्तावित केलेल्या त्यांच्या पुढील नवीन ‘कमिटमेंट्स’साठी १०० प्रयोगानंतर नाटक थांबविण्याचे ठरविले आहे.
नाटकातील हे दहा कलाकार संपूर्ण नाटकात वेगवेगळ्या २३ भूमिका करत आहेत. खरे तर सर्वच दृष्टीने हा वेगळा प्रयोग आहे. नाटकाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील नाटय़गृहांमध्ये प्रत्येकी दोन असे शेवटचे प्रयोग करून शंभर प्रयोगांचे लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर ‘नांदी’ बंद करणार असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा