दुष्काळासारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा H2O हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आणि यातून मार्ग काढण्यासाठी तरुण पिढीने गावकऱ्यांना पटवून दिलेलं श्रमदानाचं महत्व या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. ‘H2O’हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला असून एप्रिल महिन्याच्या १२ तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
सध्याच्या उकाड्याने मुंबईसह इतर शहरांतील, गावांतील लोकांना हैराण करून सोडले आहे. परंतु या उन्हापेक्षाही जास्त रखरखणाऱ्या उन्हात ‘H2O’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. जळगावमधील एका गावात, जिथे सुमारे ४५ ते ४८ अंश तापमान असते, अशा ठिकाणी हा चित्रपट चित्रीत करण्यात आला. या दरम्यान कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुळात हे कलाकार आणि इतर टीम जळगावमधील नसल्याने पाण्याची समस्या, कडक ऊन अशा सगळ्याचाच सर्वांना त्रास झाला. अनेक जण आजारीही पडले. तरी अशा परिस्थितीतही त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा मेकअप खराब व्हायचा, सतत घामामुळे कपडे भिजायचे तरीही एकही कलाकाराने कधीच तक्रार केली नाही. मोकळ्या माळरानावर जास्तीत जास्त चित्रीकरण झाल्याने सावली मिळणे कठीण होते. तरीही प्रत्येक वेळी नव्या जोशात ते कामासाठी तयार असायचे . नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या चित्रपटामध्ये अशोक एन.डी, सुप्रित निकम, धनंजय धुमाळ, शितल अहिरराव, किरण पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘H2O’ या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन मिलिंद पाटील यांनी केले असून सिनेमाची निर्मिती सुनिल झवर आणि जी. एस. प्रॉडक्शन यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New marathi movie h20 shooting in jalgaon