सध्याच्या घडीला प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी आयटम सॉग हे असतंच असतं. मग तो हिंदी चित्रपट असो किंवा मराठी चित्रपट. आयटम साँग म्हटलं कि डोळ्यासमोर येतात सुंदर नृत्यांगना मात्र पहिल्यांदाच ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामध्ये आयटम साँगवर एखादी स्त्री नव्हे तर पुरुष थिरकल्याचं पाहायला मिळालं आहे.
‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे भाईटम सॉंग नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात आयटम सॉंगच्याच धर्तीवर तयार करण्यात आलेल्या ‘भाईटम सॉंग’ प्रदर्शित झालं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे. त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो. या गाण्यावर चक्क दिग्दर्शक प्रवीण तरडेदेखील थिरकल्याचं पाहायला मिळालं आहे.
आजवर प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत पण या भाईटम साँगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स चाहत्यांना दिसणार आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. आजवर अतिशय सौम्य शब्दांची गाणी लिहिणाऱ्या प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले असून आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे.
दरम्यान, चित्रपटातील हे गाणे मनोरंजन करणारे असले तरी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न, महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडण्यात येणार आहे.