|| निलेश अडसूळ
प्रमाण मराठीच्या प्रभावाखाली दडपलेली बोलीभाषा आज सूर्यफुलासारखी मान उंचावून डोलते आहे याहून दुसरा आनंद नाही. मराठी भाषा प्रमाण मराठीच्या पूर्णविरामाजवळ थांबली असली तरीही त्याच मराठी भाषेत जन्माला आलेलं ग्रामीण साहित्य आजही विविध चित्रपटांचा कथाभाग म्हणून आपल्या समोर येते आहे. आणि भाषा म्हटलं की, केवळ साहित्याचा विचार करून चालणार नाही. तर साहित्याबरोबरच नाटक, चित्रपट, आणि काहीशा उशिरा येऊनही घराघरात पोहोचलेल्या मालिकाही भाषेच्या चलनाचा एक महत्त्वाचा भाग ठरत आहेत. सध्या मालिकांमधून बोलीभाषेचा सर्वाधिक वापर होताना दिसतो आहे.
तमाशा आणि लोकनाटय़ानंतर रंगभूमीला संगीत नाटकाने व्यापून टाकलं. त्यानंतर नाटय़जगतातली भाषा ही अभिजात झाली आणि नाटकं ही प्रस्थापितांसाठी होऊ लागली. पुढे फार्स आणि त्यानंतर सामजिक नाटकांना सुरुवात झाली. बोटावर मोजण्या इतक्या नाटय़कृती आणि लेखक वगळता बोलीभाषेला तसा प्राथमिक दर्जा कोणीच दिला नाही. परंतु बोलीभाषेला ‘हाचि माझा मार्ग एकला म्हणत’ बोलीभाषेतून नाटय़निर्मिती करून लोकांच्या मनामनात पोहचलेला एकमेव कलावंत म्हणजे मच्छिंद्र कांबळी. आपली मधाळ मालवणी बोली त्यांनी अजरामर केली. कांबळींच्या मराठी नाटकांखेरीज बोलीभाषेचा सुबक आणि सटीक वापर सहसा मराठी नाटकात आढळणं मुश्कीलच.
नाटकांइतकंच किंवा त्यापेक्षा कांकणभर जास्त प्रेम मराठी प्रेक्षकांनी दूरचित्रवाणीवर केलं आहे. घरबसल्या आणि खिशाला परवडणाऱ्या तत्त्वामुळे का होईना लोक दूरचित्रवाणी साठी वेडे झाले. सकल जगापेक्षा भारतीयांना, त्यातही विशेष करून मराठी माणसाला दूरचित्रवाणीची भलतीच भुरळ पडली. तमाशापटातून पुढे सरकल्यानंतर अनेक चित्रपट हे बोलीभाषेच्या धर्तीवर तयार केले गेले. आजही काही ठरावीक दिग्दर्शकांचे चित्रपट वगळता चित्रपटसृष्टीत बोलीभाषेचं स्थान भक्कम आहे, परंतु चित्रपटाच्या चंदेरी दुनियेला मागे सारत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मालिकांचा जन्म झाला. चित्रवाणीच्या माध्यमातून कौटुंबिक आशयाचा पेटारा खुला झाला मात्र या मालिकांमध्ये एकच एक मराठी प्रमाणभाषा वापरली जात होती. सर्वसामान्य वर्गातील लोकांना कायम असा प्रश्न पडायचा की, ‘आम्ही नाही बोलत असं’.. म्हणूनच कदाचित ग्रामीण मराठीचा वापर करणारे निळू फुले, राजा गोसावी किंवा नंतरच्या पिढीतले मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे ही मंडळी लोकांना आपलीशी वाटली. महाराष्ट्राला नागपूर-अमरावतीच्या भाषेचा गोडवा चाखायला लावणाऱ्या भारत गणेशपुरे यांना विसरून चालणार नाही.
वास्तवापासून दूर जाऊन मालिकांनी एक पुस्तकी भाषेचं जग सभोवताली निर्माण केलं होतं. या आधी बऱ्याच मालिकांमध्ये बोलीभाषेचा वापर झाला, परंतु तो मोलकरीण, गुंड, राजकारणी किंवा एखाद्या ग्रामीण भूमिकेपुरता मर्यादित राहिला होता. झी मराठीवरच्या ‘घडलंय बिघडलंय’ या मालिकेत बोलीभाषेचा उत्तम वापर करण्यात आला होता. त्यानंतर ‘कुलस्वामिनी’, ‘देवयानी’, ‘मालवणी डेज’ अशा काही बोटांवर मोजण्याइतपत मालिकांमध्ये बोलीभाषेचा वापर केला गेला होता. आज अनेक मालिकांच्या रूपाने महाराष्ट्रातल्या गावागावातली भाषा छोटय़ा पडद्यावर दिसते आहे. ‘लागीरं झालं जी’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘रात्रीस खेळ झाले’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, ‘जीव झाला येडापिसा’, ‘माझी राजकन्या’ अशा अनेक मालिकांमधून विशिष्ट बोलींचं प्रतिनिधित्व केलं जातं आहे. यातील सकारात्मक बाजू म्हणजे या बोलींमुळे गावाकडच्या अनेक तरुण आणि सच्च्या कलाकारांना संधी मिळते आहे. चाकोरीबद्ध मालिकेच्या सीमा आता तोडल्या जात आहेत. ‘लागीरं झालं जी’ ही मालिका आल्यावर अनेक प्रस्थापितांकडून टीका झाल्या, अनेकांना मालिका चालेल की नाही अशीदेखील शंका होती, परंतु काही महिन्यांतच मालिकेने टीआरपीचा उच्चांक गाठला. साताऱ्यातील ठसकेबाज भाषा, ‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणादाचं ‘चालतंय की’ आणि कोल्हापूरच्या मातीतला रांगडा जोश प्रेक्षकांनी घरबसल्या अनुभवला. राधिकाच्या मसाल्याचा नागपुरी ठसका अनेक महिलांना सक्षम करून गेला. ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका तर महाराष्ट्राच्या सीमा पार करून देशभर पहिली जाते. त्यातील अस्सल मालवणी लहेजा, पांडूचं ‘इसारलंय’ तर वच्छीचं ‘तुझा कधी भला होऊचा नाय’ हे शब्द आता विनोदाने का होईना पण रोजच्या वापरात येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे या मालिका ज्या भाषेत चित्रित होत आहेत त्याच मातीत जाऊन वास्तवदर्शी चित्रीकरण झाल्याने त्या प्रेक्षकांना अधिक भावल्या आहेत. झी मराठी पाठोपाठ आता अनेक वाहिन्या आपल्या मालिकांमध्ये बोली भाषा आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
बोलीभाषा लोकप्रिय करण्याचं श्रेय जातं ते कलाकार आणि लेखकांनाच. कारण प्रत्येक मालिकेमध्ये महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातून आलेले लोक आहेत. कुणी बीड, जालना तर कुणी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ते अगदी कोकणापर्यंत सर्व प्रांतातील कलाकार इथे आहेत. मालिकेसाठी ते त्या त्या प्रांतातील भाषा शिकत आहेत. विशेष म्हणजे नागपुरी भाषेत संवाद साधणारी राधिका नागपूरची नाही, मालवणीमध्ये बोलणारे अण्णा मालवणचे नाहीत किंवा ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मधील कर्नाटकी मराठीत आयय्यो एन्द्री करणारी वैजंता कर्नाटकातील नाही. म्हणजे हे कलाकार नव्याने भाषेचा अभ्यास करून ती बोली स्वत: आत्मसात करत आहेत.
ग्रामीण बोलीकडे वळण्यामागे वाहिन्यांचा दृष्टिकोन हा प्रामुख्याने आर्थिक असला तरी ग्रामीण भागातील प्रेक्षकांबरोबरच शहरी प्रेक्षकांनाही भाषेतला, व्यक्तिरेखांमधला हा बदल चांगला वाटतो आहे. त्यामुळे या मालिका लोकप्रिय होताना दिसत आहेत. आणि म्हणूनच ग्रामीण व्यक्तिरेखा, वातावरण याचबरोबर त्या त्या प्रांतातील बोलीभाषेलाही लोकांकडून वाढता प्रतिसाद मिळतो आहे. यानिमित्ताने का होईना महाराष्ट्राच्या बोली भाषा सातासमुद्रापार जात आहेत, ही स्तुत्य बाब नाकारता येणार नाही.
मालिकेतून बोली भाषा लोकांसोमार आल्याने सामान्य प्रेक्षकवर्गाला त्या त्या प्रांतातली भाषा कळू लागली आणि लोक ते सकारात्मकरीत्या घेऊ लागले. आज लोकांच्या मुखातून ‘का बे. कुठं जाऊन राहिला’.. असे संवाद ऐकताना मला समाधान वाटतं, की माझी भाषा मी सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकलो. भाषेनुसार गावात जाऊन चित्रीकरण होत आहे आणि ही खरी बदलाची सुरुवात आहे. मी नागपूरचा असलो तरी मला अन्य बोलीभाषा जाणून घेऊन त्यात पुढे काम करायला नक्की आवडेल. – अभिजीत लेखक- अभिनेता(माझ्या नवऱ्योची बायको)
माझी भाषा कुठे तरी दिसावी, त्या भाषेत मला लिहिता यावं, असं कायम वाटायचं. एक काळ असा होता की, आपल्या भाषेवरून आपल्याला बोललं जायचं. त्यावेळी ते खटकायचही. भाषा सुधारा, शुद्ध मराठी बोला, असा आग्रह धरला जायचा. मला अभिमान वाटतो सांगायला की, आपल्या बोलीभाषेवर आधारित मराठी मालिका आज जगभरात लोक पाहत आहेत. मराठी वाहिन्यांनी बोलीभाषांना पुढे आणण्याचा जो प्रयोग केला आहे त्याचा प्रभाव आता सर्वत्र दिसू लागला आहे. – प्रल्हाद कुडतरकर, लेखक अभिनेता. (रात्रीस खेळ चाले)
बऱ्याचदा सर्वाना सहज समजावी म्हणून मालिकेमध्ये मूळ बोलीभाषेत काही बदल केले जातात. कर्नाटकी बेळगावी भाषा शिकताना मला त्या लोकांमध्ये जाऊन अभ्यास करावा लागला, पण ती भाषा सहज समजावी म्हणून त्या भाषेतला हेल कायम ठेवून काही शब्द घेण्यात आले. शहरीकरणात लोक ना धड प्रमाण भाषा बोलत ना धड बोली. पण मालिकांच्या निमित्ताने पडद्याआड राहिलेल्या बोलीभाषांची ताकद जाणवू लागली आहे. अशा मालिकांमध्ये काम करणे हा निश्चितच वेगळा अनुभव आहे. – मीनाक्षी राठोड ,अभिनेत्री. (बाळूमामाच्या नावानं चांगभलं)
बोलीभाषा वापरली की काही लोकांना आपण गावंढळ वाटतो, पण प्रमाण म्हणजे नक्की काय, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही. प्रत्येक भाषेत एक वेगळी निरागसता आहे . ती अनुभवण्यात मजा असते. ‘जीव झाला येडापिसा’च्या निमित्ताने सांगली,कोल्हापूरचे नवनवीन शब्द मला नव्याने कळत आहेत. वेबसीरिजचे वाढते प्रस्थ पाहता मालिकांमध्ये नवनवीन बदल आणि प्रयोग करत त्या सक्षम करणं हे खरं आव्हान आहे. आणि अनेक बोलीभाषा एकत्र आल्या की महाराष्ट्र एक झाल्यासारखं वाटतं. – चिन्मयी सुमित अभिनेत्री, (जीव झाला येडापिसा)