आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेकविध भूमिकांमध्ये वृद्ध व्यक्तिरेखा साकरताना त्यांतील विविध छटांचे दर्शन लीलया घडविणारे अभिनेते दिलीप प्रभावळकर आता रसिकांसमोर ‘नारबाची वाडी’ चित्रपटातील नारबा ही आणखी वैशिष्टय़पूर्ण छटांची वृद्ध व्यक्तिरेखा सादर करणार आहेत.
चित्रीकरणाच्या निमित्ताने अनेक वेळा कोकणात गेलो असलो तरी कुडाळपासून ३०-३५ किलोमीटर आत असलेल्या मुणगी गावासारखा परिसर पाहिला नव्हता, अनुभवला नव्हता. वेगवेगळ्या भूमिका साकारताना उदाहरणार्थ ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील गांधीजींची व्यक्तिरेखा साकारताना त्यासाठी अभ्यास करण्याची नितांत गरज भासली, असे अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
‘गोळाबेरीज’ चित्रपटातील अंतु बर्वा असो, की ‘आपली माणसं’मधील पै असो किंवा ‘सरकारनामा’ चित्रपटातील अण्णा सावंत असो, कोकणातील व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली. त्या त्या भूमिका सापडणे अभिनेत्याला अनेकदा खूप आवश्यक असते. बोलण्याची वैशिष्टय़पूर्ण पद्धत, लोकांचे एकमेकांशी व्यवहार करण्याची खास तऱ्हा जाणून घेऊन त्या मातीतील व्यक्तिरेखा वाटेल अशा पद्धतीने साकारण्यात वेगळीच मजा असते, तसेच ते आव्हानही असते. त्यासाठी अनेकविध बारकावे शोधून ती भूमिका सापडण्याची गरज भासते, असेही ते म्हणाले.
वयाच्या साठीपासून ते नव्वदीपर्यंत वृद्ध व्यक्तिरेखेच्या तीन वेगवेगळ्या अवस्था दाखवणारी ‘नारबा’ ही चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारायची ठरविल्यानंतर त्या भूमिकेच्या खोलात शिरण्यासाठी, ती भूमिका ‘सापडावी’ लागते. त्यासाठी मुणगी गावात गेल्यानंतर तिथला परिसर, निसर्ग, तिथली माणसं, त्यांचे एकमेकांमध्ये केल्या जाणाऱ्या व्यवहाराची पद्धत, त्यांची भाषा या वातावरणात राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला ‘नारबा’चा आत्मा गवसला, असे प्रभावळकर यांनी आवर्जून नमूद केले.
२० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असलेल्या आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटाचे सलगपणे चित्रीकरण करण्यात आले आणि महत्त्वाचे म्हणजे पटकथा-संवाद लेखक गुरू ठाकूर चित्रीकरणाच्या वेळी हजर असल्याने कुडाळ आणि मुणगी परिसरात वापरल्या जाणाऱ्या म्हणींचा अर्थ समजावून घेऊन वाचिक अभिनयासाठी खूप फायदा झाला. नारबा हा खवचट आहे,
खोताच्या दडपणाखाली वावरतोय, त्याची एक स्वतंत्र ‘फिलॉसॉफी’ आहे, ती तो नारबा म्हणे असे सांगून अभंगांमधून सांगतो, इरसालपणा, इब्लिसपणा, प्रेमळपणा, व्यक्तिनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोद यातून नारबा आपण सादर केला, असे प्रभावळकर म्हणाले. 

Story img Loader