थ्रीडी तंत्रज्ञान मराठीत रुळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानल्या जाणाऱ्या ‘झपाटलेला-२’ या चित्रपटात पहिल्या भागातील काही पात्रे जशीच्या तशी उचलण्यात आली आहेत. पहिल्या भागात या पात्रांच्या भूमिका साकारणारे कलाकार दुसऱ्या भागातही ही पात्रे जिवंत करणार आहेत. पहिल्या भागातील कुबडय़ा खविस दुसऱ्या भागात बदलला असला, तरीही तात्या विंचूला ‘ओम फट् स्वाहा’चा मंत्र देणारा बाबा चमत्कार आणि महेश जाधव या भूमिकामध्ये जुनेच कलाकार दिसणार आहेत.
‘झपाटलेला-२’चा विचार करताना काही भूमिकांमध्ये मला तीच पात्रे हवी होती. त्यामुळे तात्या विंचूचा आवाज देण्यासाठी मी दिलीप प्रभावळकर यांना गळ घातली. त्यांनीही पहिल्या भागातील तात्या विंचूचा आवाज ऐकून तस्साच आवाज देण्याचा प्रयत्न केला आहे, असे महेश कोठारे यांनी सांगितले. पहिल्या भागात इन्स्पेक्टर महेश जाधव यांची भूमिका स्वत: महेश कोठारे यांनी साकारली होती. दुसऱ्या भागात महेश जाधव यांना बढती मिळाली असून आता ते पोलीस आयुक्त झाले आहेत. अगदी थोडय़ा काळासाठी असलेली ही भूमिकाही महेश कोठारे यांनीच साकारली आहे.
लक्ष्या बोलके, कुबडय़ा खविस, तात्या विंचू, बाबा चमत्कार अशा चमत्कारीक नावांमुळे आणि चित्रपटातील थरारामुळे ‘झपाटलेला’ गाजला होता. त्यातील बाबा चमत्कार या भूमिकेसाठी महेश कोठारे यांनी पुन्हा एकदा राघवेंद्र कडकोळ यांनाच कॅमेरासमोर उभे केले आहे. ‘बाबा चमत्कार’ पहिल्यांदा साकारला त्या वेळी आपण पन्नाशीत होतो. आता आपण सत्तरीत आहोत. त्यामुळे कॅमेरासमोर काम करणे झेपेल का, अशी शंका होती. मात्र महेश कोठारे यांनी आग्रह केला आणि आपल्यालाही हे काम पुन्हा एकदा अनुभवताना मजा आली, असे कडकोळ यांनी सांगितले. विशेष म्हणजे या थ्रीडी चित्रपटात श्रीरंगपूर हे गावदेखील कात टाकून उभे राहिले आहे.

Story img Loader