रसिका शिंदे-पॉल
काही कलाकार हे ठरावीक बाज असलेली भूमिका करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या लोकप्रिय प्रतिमेव्यतिरिक्त वेगळय़ा भूमिकेतून त्यांना पाहिलं, की त्यांच्या चाहत्यांनाही सुरुवातीला नवल वाटल्याशिवाय राहात नाही. सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ आणि ‘चंद्रविलास’ या तीन मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारे तीन कलाकार हे सोज्वळ, साध्या, विनोदी आणि विशेष म्हणजे सकारात्मक भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात. मात्र, सध्या अभिनेत्री कविता मेढेकर अर्थात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील भुवनेश्वरी, ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील रुपाली आणि अभिनेता वैभव मांगले ‘चंद्रविलास’ मालिकेतील नरहरी पंत अशा नकारात्मक, भयावह वेगळय़ा धाटणीच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत.
आजवर कविता मेढेकर आणि ऐश्वर्या नारकर या दोन्ही अभिनेत्रींना सोज्वळ, साध्या, लाघवी, सकारात्मक बाजू असलेल्या भूमिकांमधून पाहण्याची प्रेक्षकांना सवय होती, मात्र अचानक या दोन्ही अभिनेत्रींनी नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांना अचंबित केले, तर विनोदाचे अचूक टायिमग साधणारा अभिनेता अशी ओळख असणाऱ्या वैभव मांगले यांनी भयावह भूमिका साकारत प्रेक्षकांची वाहवा नक्कीच मिळवली आहे.
‘भूमिकेत स्वत:ला झोकून देता आलं पाहिजे’
नट हा स्वार्थी असतो, कारण प्रत्येक चांगली भूमिका ही आपण साकारावी असे त्यांना वाटत असतेच; परंतु ते करत असताना त्या पात्राला किंवा व्यक्तिरेखेला न्याय कसा देता येईल याची जबाबदारी कलाकारांच्या खांद्यावर असते. अभिनय आपल्याला येतोच; पण अभिनय करणं म्हणजे अभिनयाचे विविध पैलू सादर करण्याची शैली कलाकाराकडे कशी आहे हेदेखील पाहिले जाते; परंतु विविधांगी भूमिका जरी असल्या तरी तो कलाकार त्यात अभिनयाचे नावीन्य टाकत नसेल तर एक साचेबद्धपणा येतो, असे वैभव मांगले यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे त्या भूमिकेत आपल्याला घुसता आले पाहिजे. त्या भूमिकेत स्वत:ला झोकून देत ती आपलीशी केली पाहिजे, असेही मांगले यांनी स्पष्ट केले. कलाकाराने भूमिकांमधला वेगळेपणा कायम जपला पाहिजे, असा सल्लाही मांगले यांनी दिला, तर कविता यांनी प्रत्येक भूमिकेत कलाकाराने आपलेपणा निर्माण करत, विनोदी, सौम्य, नकारात्मक कोणत्याही शैलीतील भूमिका वाटेला आली असली तरी त्यात आपण काय करू शकतो हे महत्त्वाचे असते, असे सांगितले. ‘‘प्रत्येक भूमिकेचे कंगोरे वेगळे असतात. पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारत असल्यामुळे त्या भूमिकेविषयी जास्त अभ्यास केला, कारण ती व्यक्तिरेखा समजल्याशिवाय अभिनयात ती उतरवता येणं शक्य नसतं. याशिवाय, सहकलाकारांसोबत चित्रीकरण असल्यास त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करत प्रतिसाद द्यावा लागतो,’’ असे ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले.
‘व्यक्तिरेखेचा अभ्यास महत्त्वाचा’
कोणत्याही प्रकारची भूमिका साकारताना ती व्यक्तिरेखा कशी दिसेल, याचाही अभ्यास केला जातो. यातच त्या पात्राचा आत्मा असतो असं म्हणावं लागेल. कविता मेढेकर याबाबत म्हणतात, ‘‘या मालिकेतील भुवनेश्वरी ही फार वेगळी आहे. ती जरी नकारात्मक असली तरी ती आई म्हणून सोज्वळ आहे, इतरांची मालकीण म्हणून रुबाबदार आहे. त्यामुळे माझा चेहरा जरी सोज्वळ भूमिकांसाठी तंतोतंत जुळत असला तरी माझ्या वेशभूषेतून, माझ्या बोलण्या-चालण्यातून मला भुवनेश्वरी हे पात्र करायचे होते. त्यामुळे माझ्या लुकवर आणि भाषेवर, आवाजावर जास्त मेहनत केली.’’ भुवनेश्वरी हे नकारात्मक पात्र साकारताना त्या पात्राचे उठणे, बसणे, चाल, नजर या सर्व गोष्टी मला लेखिका आणि दिग्दर्शकाने सांगितल्या होत्या. त्यानंतर मी त्या व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने भूमिका साकारत गेले, असे सांगत पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारत असल्याने आधी समजून घेऊन मग अभिनयातून ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेन, असा विचार करतच हे नवे पाऊल उचलले. अमुक एका बाजाचीच भूमिका मी साकारू शकते, हा समजही मोडून काढण्याचा हा प्रयत्न होता, असे कविता यांनी सांगितले. तर ‘चंद्रविलास’ मालिकेतील २०० वर्षांपूर्वी मृत पावलेल्या नरहरी पंत यांच्या मृत आत्म्याची भूमिका साकारताना दडपण आल्याचे मांगले यांनी सांगितले; परंतु नेहमीसारखे भूत न दाखवता यात आपण कलाकार म्हणून काय वेगळं करू शकतो यासाठी मी अभ्यास केला. २०० वर्षांपूर्वीचा तो मृत आत्मा आहे, त्यामुळे तो कसा असेल? तर तो पांढराफटक असेल, त्याच्या पापण्यांची उघडझाप होत नसेल. त्याचा आवाज खर्जातला असेल. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान संवाद बोलत असताना मी सताड डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला, मृत होत गेलेला आवाज काढण्याचा प्रयत्न केला, अशी भूमिकेची तयारी केल्याचे मांगले यांनी सांगितले.
प्रत्येक कलाकाराची एक जमेची बाजू असते. तशी विनोदी, गंभीर, सौम्य अशा विविध भूमिका एक कलाकार साकारतो अशी छबी तयार होते, मात्र ज्या वेळी तोच कलाकार वेगळय़ा प्रकारची भूमिका पहिल्यांदाच साकारतो त्या वेळी अनपेक्षितपणे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. कधी तो चांगला असू शकतो तर कधी वाईट; परंतु प्रेक्षकांची दाद ही कलावंताच्या कामाची पोचपावती असते. कविता मेढेकर यांनी असाच एक किस्सा सांगितला. ‘‘एक गृहस्थ नाटकाच्या प्रयोगानंतर भेटले होते. ते मला म्हणाले, तुमच्या आजवरच्या सर्व भूमिका मी पाहिल्या आणि त्या आवडल्या आहेत; पण आता भुवनेश्वरीची तुम्ही भूमिका साकारत आहात त्यात तुम्ही जो आब आणला आहे आणि आवाज बदलून काम करत आहात ते जास्त आवडते,’’ असा आपुलकीचा किस्सा सांगत प्रेक्षक तुमच्या भूमिका बारकाईने बघतात, त्यामुळे कलाकार म्हणून जबाबदारी वाढते, असेही त्यांनी सांगितले. कलाकार हा रंगभूमीशिवाय अपुरा आहे हेच खरे. त्या नाटकात काम केल्यामुळे संवाद घशातून नाही तर पोटातून बोलण्याची सवय असल्याने मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान साऊंड रेकॉर्डिग फार सोप्पं जातं अशी नाटय़भूमीची खासियत कविता यांनी सांगितली. ‘‘एका ताईंनी सांगितलं की, आम्ही तुमचा एक सीन रेकॉर्ड करून ठेवला आहे. जिथे तुम्ही हसता आणि अचानक पुढे येता. आमच्या मुलाने काही खाल्लं नाही तर आम्ही त्याला तो व्हिडीओ दाखवतो आणि बघ खाल्लं नाहीस तर चंद्रविलास येईल, असं सांगतो, असा प्रेक्षकांचा किस्सा सांगत माझ्या भूमिकेचे नावच बदलले,’’ असे मिश्कीलपणे म्हणत प्रेक्षकांची दाद तुम्हाला नवे काम करण्यासाठी उत्साह देते, असेही मांगले यांनी सांगितले.
‘विविधांगी भूमिका मिळणं ही मोठी गोष्ट’
कलाकाराच्या यशाचा किंवा त्याच्या वाटेला येणाऱ्या विविधांगी भूमिकांचा एक काळ असतो. जसा काळ पुढे जातो तशी कलाकाराची अभिनयाची भूक वाढत जाते. नवं काही तरी करावं आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं ही त्यांची धडपड सुरू होते. याबद्दल बोलताना कविता म्हणतात, ‘‘अनेक नाटकांमधून, मालिकांमधून विनोदी भूमिका साकारल्या होत्या. त्या वेळी फक्त विनोदीच भूमिका करते अशी छबी तयार झाली होती. मात्र, ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका मिळाल्यानंतर ही सोज्वळ, सालस भूमिका साकारू शकते अशी छबी तयार व्हायला लागली आणि मग माझी वाटचाल सौम्य भूमिकांकडे चालू झाली. मुळात कलाकार म्हणून तुमच्याकडे विविध प्रकारचा बाज असलेल्या भूमिका येणं हीच मोठी गोष्ट आहे.’’ तर वैभव मांगले म्हणतात, ‘‘नट म्हणून तुम्हाला सतत अभ्यास, चिंतन, निरीक्षण करावेच लागते आणि जेव्हा याचे सातत्य कायम राहते त्या वेळी तुम्ही नव्याने काही तरी कलाकृती साकारू शकता.’’