* चित्रपट वितरणही सुरू करणार
* ‘एक गाव एक दिवस दत्तक’ विशेष उपक्रम

मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांतील चित्रपटांचे विपणन आणि वृद्धी यासाठी ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’ने मराठी चित्रपट, नाटक, संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्याने विविध योजना हाती घेतल्या असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी येथे दिली. तसेच सामाजिक जाणिवेतून समर्थ सामाजिक सेवा संस्थेच्या सहकार्याने ‘एक गाव एक दिवस दत्तक’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही पाटकर यांनी सांगितले.
मराठी चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘डायरेक्ट टू होम’या व्यासपीठाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून ‘चित्रपटांची वाहिनी’ तयार करण्यात येणार असल्याचे सांगून पाटकर म्हणाले, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघुपट, माहितीपट महोत्सवासाठी चित्रपट पाठविण्याच्या प्रक्रियेसाठी विशेष विभाग सुरू केला जाणार आहे. मराठीसह प्रादेशिक भाषांतील चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांना याचा लाभ घेता येईल. ‘इंटरनेट’च्या माध्यमातूनही मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या सगळ्याची जबाबदारी अनुक्रमे अनंत पणशीकर, नीलकांती पाटेकर, प्रवीण ठक्कर पाहणार आहेत.
मिलिंद दातार यांच्या सहकार्याने महामंडळातर्फे चित्रपट वितरण सुविधाही सुरू केली जाणार आहे. गीतगायन, ध्वनिमुद्रण (२० ते २६ ऑक्टोबर) नृत्य, अभिनय (१४ ते २० नोव्हेंबर) या विषयावरील कार्यशाळांचेही आयोजन केले जाणार असून त्यासाठी अशोक पत्की, दिपाली विचारे, विद्या पटवर्धन यांचे सहकार्य मिळाले आहे. सामाजिक जाणिवेतून समर्थ सामाजिक सेवा संस्थेच्या मदतीने ‘एक गाव एक दिवस दत्तक’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड येथील वनवासी पाडय़ांवरील वनवासींसाठी अन्न, वस्त्र, दैनंदिन मूलभूत जीवनावश्यक गोष्टी, शालेय साहित्य यांचे वाटप केले जाणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्राच्या मदतीने वैद्यकीय चिकित्सा व मोफत औषधोपचार पुरविले जाणार असल्याची माहितीही पाटकर यांनी दिली. या उपक्रमास ज्यांना मदत करायची आहे त्यांनी तसेच अधिक माहितीसाठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात ०२२-२४३०८८७६ या क्रमांकावर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही पाटकर यांनी केले.

Story img Loader