‘तो येतोय कल्ला तर होणारच…’ अशी घोषणा करत ‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व रविवार, २८ जुलैपासून दररोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर दाखल होत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाची धुरा सूत्रसंचालक म्हणून अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांभाळली होती. यंदा मात्र ही जबाबदारी हिंदी-मराठीतील नावाजलेला अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या खांद्यावर असल्याने ‘बिग बॉस’च्या घरातील सत्ताकारण खास रितेशच्या शैलीत रंगणार आहे. ‘बिग बॉस’च्या या नव्या पर्वात कोणते कलाकार स्पर्धक म्हणून घरात शिरणार हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र या पर्वात ‘लय भारी’ गंमत आणण्यासाठी रितेश देशमुख सज्ज आहे. रितेशचा अनोखा अंदाज या पर्वात पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव

‘मी स्वत: या कार्यक्रमाचा चाहता आहे, त्यामुळे जेव्हा आपल्या आवडत्या कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळते त्या वेळी प्रत्येक कलाकार आवडीने ते काम करतो. माझ्यासाठी ही उत्तम संधी मानण्यापेक्षा या पर्वाचे सूत्रसंचालन करण्याचा मान मिळाला आहे असे मला वाटते. मी स्वत: या नव्या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे’ अशी भावना रितेश देशमुख याने व्यक्त केली. तर कलर्स मराठीचा सगळ्यात मोठा कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’ दोन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यंदा बॉलीवूडचा स्टायलिश स्टार आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार रितेश देशमुखवर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आम्ही सोपवली आहे. त्यामुळे हे पर्व हटके असणार आहे, अधिक टवटवीत आणि तरुण असणार आहे, असे कलर्स मराठी वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख व प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले. चक्रव्यूहात सापडणार स्पर्धक ‘बिग बॉस मराठी’चे घर यंदा खास चक्रव्यूह संकल्पनेच्या अनुषंगाने रचण्यात आले आहे. घरातील प्रत्येक कोपरा खूप विचारपूर्वक रंगवण्यात आला आहे. घरातील प्रत्येक गोष्ट गोलाकार ठेवण्यात आली असल्याने चक्रव्यूह ही संकल्पना अधोरेखित होते. घरातील सदस्यांसाठी ‘बिग बॉस’च्या घरात पाण्याखाली शयनकक्ष उभारण्यात आले आहेत. घराचा मुख्य भाग असलेल्या दिवाणखान्यात रितेश भाऊ दर आठवड्याला स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. या जागेत मुखवट्यांनी सजवलेली भिंत आहे, त्यामुळे स्पर्धकांचे मुखवटे इथेच उतरवले जातील. शिवाय प्रशस्त अशा स्वयंपाकघराबरोबरच ‘बिग बॉस’च्या घरात यंदा ‘चाय पे चर्चा’ करण्यासाठी खास कट्टा तयार करण्यात आला आहे. एकंदरीतच ‘बिग बॉस मराठी’च्या घराची रचना ही त्यात शिरणाऱ्या सदस्यांनाही चक्रावून टाकणारी अशीच आहे. २८ जुलैपासून दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर बिग बॉसच्या घरातील हा रंजक खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New season of marathi bigg boss starts today on colors marathi channel zws