नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच नवे विषय आणि नवे चेहरे घेऊन दोन मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर दाखल होत आहेत. ‘रमा राघव’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या दोन नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक प्रेमकथेचा आरंभ हा गोड होतोच असं नाही, असं म्हणतात. एकमेकांचा तिरस्कार करणारी, भिन्न स्वभावांची आणि भिन्न विचारसरणींची दोन माणसं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असं वाटतं; पण प्रेमात या अशा माणसांना एकत्र आणण्याची ताकद असते. तसंच पहिल्या नजरेत आपल्याला जशी एखादी व्यक्ती दिसते ती तशी असेलच असं काही सांगता येत नाही. अगदी तसंच होणार आहे सावी आणि रमाचं..
‘कलर्स मराठी’वर अशा दोन नायिकांची कथा पाहायला मिळणार आहे ज्यांचे स्वभाव, राहणीमान आणि विचार अतिशय वेगळे आहेत. एक मनमोकळी आहे आणि तर दुसरी बेधडक. एक जरा उद्धट आहे तर एक स्पष्टवक्ती. दोघींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि व्याख्या वेगळी आहे. जेव्हा या मुलींच्या आयुष्यात त्यांच्याहून वेगळय़ा स्वभावाच्या दोन व्यक्ती येतील तेव्हा त्यांचं आयुष्य किती बदलेल? ज्यांची ओळखच मुळात गैरसमजुतीतून झाली आहे त्यांच्यात प्रेम कसं फुलेल? या प्रश्नांची उत्तरं ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ रात्री १० वा. तर ‘रमा राघव’ रात्री ९.०० वा. या मालिकांमधून मिळणार आहेत. कलर्स मराठीवर ९ जानेवारीपासून या दोन मालिका प्रेक्षकांना पाहता येतील.
‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेची कथा चिन्मय मांडलेकर यांनी लिहिली असून निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. या मालिकेत सावीची भूमिका रसिका वखारकर आणि अर्जुनची भूमिका इंद्रनील कामत साकारणार आहेत. तर ‘रमा राघव’ या रोहिणी निनावे लिखित मालिकेची निर्मिती क्रिएटिव्ह ट्रान्समीडिया यांनी केली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या शेटेचा तिखट अंदाज तर अभिनेता निखिल दामलेचा प्रसन्न गोडवा यामुळे खटय़ाळ प्रेमाची ही ‘तिखटगोड’ गोष्ट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
‘आपण याआधीदेखील अनेक प्रेमकथा पाहिल्या आहेत, मग ती वैचारिक मतभेदातून निर्माण झालेली असो वा द्वेषातून असो वा ग्रामीण पार्श्वभूमीवरची प्रेमकथा असो. एकंदरीतच प्रेक्षकांची आवड लक्षात घेता प्रत्येक कथेला त्याचा असा एक सूर असतो आणि तो अचूक मिळणं खूप गरजेचं असतं तर ती मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटते. प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेऊन आगामी मालिकांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहे जे आजच्या तरुण पिढीसोबत इतरांनादेखील आवडतील,’ असा विश्वास कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख अनिकेत जोशी यांनी व्यक्त केला. ‘तरुण पिढीची आवड आणि कल लक्षात घेत ‘रमा राघव’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या तरुणाईचा बाज असलेल्या मालिका आम्ही घेऊन येत आहोत. या कथांची मांडणीच मुळात खूप वेगळय़ा पद्धतीने केली आहे आणि तेच या मालिकांचं वैशिष्टय़ आहे असं आम्हाला वाटतं. दोन्ही कथा एकमेकांपेक्षा अतिशय वेगळय़ा असल्या तरी विषय खिळवून ठेवणारे आहेत,’ असे ‘कलर्स मराठी’चे कार्यक्रम प्रमुख विराज राजे यांनी सांगितले.