सोनी मराठी वाहिनी लवकरच विनोदी आणि कौटुंबिक मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ असे या मालिकेचे नाव असून राकेश सारंग यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर नयना आपटे, सीमा देशमुख, शर्वाणी पिल्ले, विनय येडेकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबतच महिमा म्हात्रे, रेवती लिमये, अनुज साळुंखे, अमित खेडेकर, अजिंक्य जोशी हे नवोदित कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.०० वाजता ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.
मुंबईतल्या उपनगरात अजूनही टिकून राहिलेलं एक जुनं बैठं घर ज्याला आसपासचे लोक ‘चेटकिणींचं घर’ म्हणून ओळखतात तेच आहे या नव्या मालिकेतील तेंडुलकरांचं घर. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनुभवांनी काहीशा पुरुषघाण्या झालेल्या भागीरथीबाई या घराच्या प्रमुख आहेत. तर मालिनी तेंडुलकर मोठी सून आणि तिच्या दोन मुली दिव्या आणि सानिका. यांच्याबरोबर भागीरथीबाईंची धाकटी मुलगी पल्लवी हिचा घटस्फोट झाला आहे आणि तिच्या मुलीच्या कस्टडीची केस अजूनही कोर्टात चालू आहे.
परिस्थितीवर मात करत भागीरथीबाईंनी चालवलेला आपल्या मसाल्याचा व्यवसाय या सगळय़ा मिळून सांभाळतात. तेंडुलकरांच्या गोडय़ा मसाल्याची कीर्ती सर्वदूर पसरलेली असल्याने त्यांच्या व्यवसायाचा चांगलाच जम बसलेला आहे. मात्र या सगळय़ा बायकांचं एकच धोरण सगळय़ांना खटकतं आहे. ‘जगात वाईट पुरुष जात, सगळेच लुच्चे एकसाथ..’ हे त्यांचं घोषवाक्य आहे आणि या त्यांच्या विचाराला तडा देणारा एक तरुण वादळासारखा त्यांच्या कुटुंबात दाखल होतो. तो या महिलांची विचारसरणी बदलू शकेल का? भागीरथीबाईंसमवेत घरातील इतर महिलांच्या स्वभावात आलेली कटुता कमी करायला हा तरुण मदत करेल का? सानिकावरील प्रेमाखातर तेंडुलकरांच्या घरातील महिलांचे प्रश्न सोडवण्यात तो यशस्वी होईल का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ या नव्या मालिकेतून मिळणार आहेत.