हॉलीवूडमधील चित्रपटांचा ‘रिमेक’रतीब लावून ब्लॉकबस्टरी सांगीतिकांची प्रेक्षकांना सवय लावणारा भट्ट कॅम्प आपल्या नव्या-कोऱ्या रिमेकसाठी सज्ज झाला आहे. अभिजात भयपटांमध्ये गणल्या गेलेल्या ओमेनचा रिमेक भट्ट कॅम्पाच्या भट्टीतून साकारला जाणार आहे. भट्ट कॅम्पचा मराठमोळा दिग्दर्शक विशाल महाडकर या रिमेकचे दिग्दर्शन करणार असून हिंदीत येताना हा थरारपट ‘राज ४’ म्हणून अवतरणार असल्याची चर्चा आहे. पण भट्ट कॅम्पने ‘राज ४’ असे या रिमेकचे नामकरण केले असले तरी पटकथा पूर्ण झाल्यानंतरच आपण या नावाविषयी निर्णय घेऊ, असे महाडकर यांनी सांगितले. ‘द ओमेन’चा रिमेक करावा हा विषय खूप दिवस मनात घोळत होता. ‘ब्लड मनी’ पूर्ण झाल्यानंतर दुसरा चित्रपट म्हणून त्याचसाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले आणि निर्माता महेश-मुकेश भट्ट यांच्यासमोर तसा प्रस्ताव ठेवला होता, अशी माहिती महाडकर यांनी दिली.
भट्ट कॅम्पबरोबर सहायक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या विशाल महाडकर यांनी २०१२ साली ‘ब्लड मनी’ या चित्रपटाद्वारे स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कुणाल खेमू आणि अमृता पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला तिकीटबारीवर संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी एक वेगळा विषय म्हणून विशालचे कौतुक झाले होते. आता दुसऱ्या चित्रपटासाठी विशालने ‘द ओमेन’ या २००६ साली आलेल्या प्रसिद्ध हॉलिवूडपटाची ( जो १९७६ साली आलेल्या ओमेन चित्रपटाचा रिमेक होता) निवड केली आहे.
‘द ओमेन’ हा एक रहस्यमय थरारपट आहे. त्यामुळे या चित्रपटाला भट्ट कॅम्पशिवाय पर्याय नव्हता. निर्माते म्हणून हा चित्रपट ‘राज’ मालिकेत ओळखला जावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘राज ४’ या नावाने प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे महाडकर यांनी सांगितले. मात्र, ‘द ओमेन’चा रिमेक चांगला होण्यासाठी त्याची पटकथाही तितकीच जमून येणे आवश्यक आहे. सध्या पटकथेवर अंतिम काम सुरू असून त्यानंतर ‘राज ४’ हे नाव योग्य वाटले नाही तर ते बदलले जाण्याची शक्यताही महाडकर यांनी बोलून दाखवली. भट्ट कॅम्पशिवाय आणखी दोन प्रॉडक्शन हाऊसबरोबर चित्रपटांची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
भट्ट यांच्या भट्टीमधून ‘ओमेन’ नवा!
हॉलीवूडमधील चित्रपटांचा ‘रिमेक’रतीब लावून ब्लॉकबस्टरी सांगीतिकांची प्रेक्षकांना सवय लावणारा भट्ट कॅम्प आपल्या नव्या-कोऱ्या रिमेकसाठी सज्ज झाला आहे.
First published on: 12-12-2013 at 08:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New the omen from bhatt company