‘देख भाई देख’ या मालिकेची निर्मिती अभिनेत्री जया बच्चन यांनी ‘सोनी’ वाहिनीसाठी केली होती. आता त्याच ‘सोनी’ वाहिनीवर पहिल्यांदाच मालिकेतून एक अभिनेत्री म्हणून येण्याच्या तयारीत असलेल्या जया बच्चन यांची आपला छोटय़ा पडद्यावरचा प्रवेश जोरदार व्हावा यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या मालिकेची निर्मिती बच्चन प्रॉडक्शनकडूनच होणार असल्यामुळे आपल्याबरोबर कोण कोण काम करणार इथपासून ते आपला लुक कसा असेल अशा सगळ्या बारीकसारीक गोष्टी त्यांच्या सल्ल्याने केल्या जात आहेत.
छोटा पडदा जेव्हा नवा होता तेव्हाच जया बच्चन यांनी त्यात रस घेऊन ‘देख भाई देख’सारख्या धम्माल कौटुंबिक विनोदी मालिकेची निर्मिती केली होती. पण, त्यानंतर का कोण जाणे त्यांनी पुन्हा छोटय़ा पडद्यावर येण्यात रस दाखवला नव्हता. आता टीव्ही उद्योगाची उलाढाल पराकोटीला पोहोचली असताना जया बच्चन आणि अमिताभ बच्चन या पतीपत्नींनी केवळ निर्मितीतच नव्हे तर अभिनयातही रस दाखवला आहे. एकीकडे अमिताभ बच्चन यांनी अनुराक कश्यपबरोबर जोडी जमवली असून त्याच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारी महामालिका सोनीवर रुजू होणार आहे. तर त्याआधीच एका गुजराती कादंबरीवर आधारित मालिकेत जया बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पतीच्या निधनानंतर संपूर्ण घर एकटीने सांभाळणाऱ्या स्त्रीची भूमिका जया बच्चन करत आहेत. दोन विवाहित मुलं, नातवंडं आणि एक मुलगी असा टीव्हीवरचा नवा परिवार त्यांना सांभाळायचा असून या परिवारातील सदस्यांची निवडप्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे.
सोनीवरची ही मालिकाही ‘बच्चन प्रॉडक्शन हाऊस’चीच निर्मिती असल्याकारणाने प्रत्येक कलाकाराची निवड सध्या जया बच्चन यांच्या सल्ल्यानुसार होते आहे. ऑडिशन घेतल्या की त्याच्या टेप्स त्यांना दाखवायच्या आणि मग पुढची प्रक्रिया सुरू करायची, असा सध्या वाहिनीचा सिलसिला सुरू आहे. त्यातूनच  ‘देख भाई देख’चे या आपल्या मालिकेत काम केलेल्या दोन कलाकारांची निवड जया बच्चन यांनी केली आहे, विशाल सिंग आणि उर्वशी ढोलकिया हे दोन कलाकार कित्येक वर्षांनंतर जया बच्चन यांच्याबरोबर पुन्हा काम करणार आहेत. पण, त्यांच्या मुलीची भूमिका कोण करणार? आणखी कोण कलाकार असतील?, या प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळतील. या मालिकेत जया बच्चन यांच्या पतीचा उल्लेख नगण्य असल्याने ती भूमिका कोण करणार?, याला अजूनतरी तेवढे महत्त्व दिले गेलेले नाही. पुढचे वर्ष छोटय़ा पडद्यावर तरी ‘बच्चन’ धम्माल असणार यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा