सत्ता मिळावी यासाठी होणारं राजकारण अनेक चित्रपटांमधून दाखविण्यात आलं आहे. ‘सामना’, ‘सिंहासन’ या गाजलेल्या चित्रपटांपासून ते अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरळा’ या चित्रपटांपर्यंत अनेकांमधून सत्तेचं राजकारण उलगडण्यात आलं आहे. अशातच आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे राजकारणातील खेळींमुळे लहान मुलांवर त्याचा कसा परिणाम होतो हे आगामी खुर्ची या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
स्वरुप सावंत दिग्दर्शित ‘खुर्ची’ या चित्रपटातून सत्तेसाठी केल्या जाणाऱ्या राजकारणाचा कुटुंबावर आणि खासकरुन लहान मुलांवर कसा परिणाम होतो यावर भाष्य करण्यात येणार आहे.
‘माझा बाप नेहमी म्हनतो, मानूस वयाने लहान असतो. पन स्वप्न बघायला वय नसतं. ते कोनत्या बी वयात पुर्न करू शकतो. आता खुर्ची आपलीच… ’ या वाक्यामधून ग्रामीण पातळीवरील राजकारणाचा परिणाम हा लहान मुलांवरही झाल्याचं दिसून येतं. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे हे अद्यापतरी गुलदस्त्यात आहे. ‘बॅलेंस’ आणि ‘पॉस्को-307’ नंतर स्वरूपचा हा तिसरा चित्रपट आहे.