फॅशन डिझायनिंग असेल नाहीतर अभिनयाचे क्षेत्र असेल अशा वेगळ्या वाटेवरच्या व्यवसायांकडे जाण्याची इच्छा असते पण, योग्य मार्गदर्शन नसल्याने तिथपर्यंत पोहोचण्यात अनेक अडचणी येत राहतात. मात्र, या अशा क्षेत्रांबद्दल एकाच वेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि त्यासाठीची शिष्यवृत्ती अशी दुहेरी संधी ‘स्वप्नांना पंख नवे’ या स्टार प्रवाह वाहिनीच्या उपक्रमात मिळणार आहे. एका वाहिनीकडू केल्या जाणाऱ्या या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून होतकरू महिलांच्या स्वप्नांना नवे बळ देण्यासाठी ‘लोकसत्ता’नेही सहकार्य दिले आहे.
स्टार प्रवाह वाहिनी. फेअर अँड लव्हली कंपनी आणि लोकसत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वप्नांना पंख नवे’ या उपक्रमात ब्युटी अँड स्कीन केअर, फॅशन डिझायनिंग, अभिनय, फुड अ‍ॅँड कॅटरिंग तसेच अन्य लघुउद्योग क्षेत्रात शिरू पाहणाऱ्या महिलांना या क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच स्टार प्रवाह आणि फेअर अँड लव्हलीच्या वतीने त्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नाशिक येथे होणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी २६ मार्च ते १५ एप्रिल २०१४ या कालावधीत १८००२००८३५५ या टोल क्रमांकावर एक मिस कॉल देऊन आपला सहभाग नोंदवता येणार आहे. या नोंदणीत निवडलेल्या महिलांनी विविध चाचण्यांना सामोरे जावे लागणार असून त्यातील वीस निवडक महिलांना आपले स्वप्न साकारण्याची संधी मिळणार आहे. अभिनयासाठी मृणाल कु लकर्णी, फॅशन डिझायनिंगसाठी पूर्णिमा ओक, लघुउद्योगासाठी योगिता कारले, फुड अँड कॅटरिंगसाठी अदिती कामत तर ब्युटी अँड स्कीनसाठी भरत आणि डोरिस अशा नामवंतांकडून हे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या पाच विभाागांतून विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या महिलांचे नावही हेच तज्ज्ञ घोषित करणार असून विजेत्या महिलांना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
स्वप्नपूर्तीचा हा प्रवास १९ मे ते २४ मे २०१४ दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवर विशेष भागांतून प्रसारित केला जाणार आहे. ‘स्वप्नांना पंख नवे’ या उपक्रमाच्या निमित्ताने केवळ मालिकांतून नव्हे तर प्रत्यक्षातही स्त्रियांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी स्टार प्रवाहने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
यापुढेही अशाच प्रकारच्या उपक्रमांतून सामाजिक बांधीलकी जपण्याचा वाहिनीचा प्रयत्न असेल, असे वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील यांनी सांगितले. तर मराठी टेलिव्हिजनवर असा प्रयोग पहिल्यांदाच असून आपल्याला या उपक्रमाशी संलग्न होताना खूप आनंद झाला असल्याचे मत अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने व्यक्त केले. अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी मेहनत, गुणवत्ता यांच्याबरोबर चांगल्या भूमिका मिळवण्याचे नशीबही लागते. या उपक्रमातून स्त्रियांना अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मार्गदर्शन करायला नक्कीच आवडेल, असेही मृणाल कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.