झी युवा या वाहिनीने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात चांगलेच स्थान मिळविले आहे. या वाहिनीवरील मालिका आणि त्या मालिकांमधील कलाकारांनीही प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. झी युवा या वाहिनी वरील अशीच एक गाजलेली मालिका म्हणजे ‘बन-मस्का’. या मालिकेचे कथानक आणि आणि आजच्या तरुणाईच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. याच मालिकेती सौमित्रल आणि मैत्रेयी या दोघांच्या आंबटगोड केमिस्ट्रीने तर, अनेकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे या सरत्या वर्षांची सुरुवातही ‘बन-मस्का’सारखी ‘मख्खनदार’ बनविण्यासाठी आणि नव्या वर्षातील संकंल्पांविषयी सांगण्यासाठी तुमच्या भेटीला आली आहे तुमची लाडकी मैत्रैयी म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळे.
नवीन वर्षातील संकल्पाविषयी सांगताना शिवानी म्हणाली की, ‘नवीन वर्षाचं माझं रीजोल्युशन ‘पॉझिटिव्ह राहणं आणि हीच पॉझिटिव्हिटी इतरांनाही देणं’ हे आहे. आपण खूप कामात असतो, त्या कामाचा बऱ्याचदा भरपूर स्ट्रेस आपल्यावर येतो आणि बऱ्याचदा आपल्याला स्ट्रेस येतोय याच गोष्टीकडे आणि पर्यायाने स्वत:कडे आपलं दुर्लक्ष होतं. त्याचा परिणाम आपल्या स्वत:च्या मनावर, शरीरावर, नातेसंबंधावर पडतो. त्यामुळे येत्या वर्षात स्वत:च्या मनाची, शरीराची नीट काळजी घेऊन, स्वत:ला शक्य तितकं ‘पॉझिटिव्ह’ ठेवणे आणि हीच पॉझिटिव्हिटी इतरांनाही देणं हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे’. सकारात्मकतेकडे जास्त कल असणारी शिवानी यापुढे म्हणाली की, ‘माझं मन आणि शरीर जर हेल्दी असेल, तर मी उत्तम काम करू शकेन आणि उत्तम नाती जोडू शकेन. त्यासाठी चांगली पुस्तकं सतत वाचणं, उत्तम फिल्म्स बघणं, चांगल्या लोकांमध्ये रमणं, जमेल तशा १-२ नवीन गोष्टी शिकणं हे सर्व मी करणार आहे. हीच पॉझिटिव्हिटी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात येवो आणि ह्या वर्षात आपणा सर्वांच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडो, हीच माझी सदिच्छा’.
शिवानीच्या या वक्तव्यावरुन असेच स्पष्ट होत आहे की, मालिकेत ज्याप्रमाणे ती ‘फुल ऑफ लाइफ’ आहे त्याचप्रमाणे खऱ्याखुऱ्या जीवनातही तिला आनंदी राहायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनानेच पाहायला आवडते.