अल्लू अर्जुन हा सध्या भारतातला सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून ओळखला जात आहे. त्याच्या ‘पुष्पा’या चित्रपटाने केवळ देशालाच नव्हे तर साऱ्या जगाला वेड लावलं आहे. ‘पुष्पा’साठी आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेपासून अगदी ‘ऊ अंटावा’वर थिराकणाऱ्या समंथापर्यंत सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. लॉकडाउन काळात अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ला अभूतपूर्व असं यश मिळालं. चित्रपट ओटीटीवर येऊनसुद्धा चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची गर्दी वाढतच होती. या चित्रपटातली प्रत्येक व्यक्तिरेखा आजही सगळ्यांना लक्षात आहे. पुष्पाच्या या बिनधास्त अंदाजाने चक्क न्यू यॉर्कच्या महापौरांना भुरळ घातली आहे.
न्यू यॉर्कमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात भारताकडून तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अल्लू न्यू यॉर्कचे मेयर म्हणजेच महापौर एरिक अॅडम्स यांना भेटला. तिथे त्यांच्यात बऱ्याच गप्पा झाल्या. इतकंच नाही तर अल्लूने त्यांना ‘पुष्पा’मधली त्याची खास स्टाईल शिकवली आणि त्यांच्यासोबत फोटोसुद्धा क्लिक केले.
याबद्दल अल्लूने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. न्यू यॉर्कच्या महापौर यांना भेटून छान वाटलं असं म्हणत अल्लूने त्यांचे आभार मानले आहेत. सोबत त्या कार्यक्रमातले काही फोटोजसुद्धा त्याने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पुष्पाप्रमाणे न्यू यॉर्कचे महापौर हनुवटीवरून हात फिरवत असताना आपल्याला दिसतील.
आणखीन वाचा : ‘पुष्पा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रीकरणाचा मुहूर्तही ठरला
नुकतीच पुष्पाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाचीसुद्धा तारीख निश्चित झाल्याचं निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे. पुष्पाच्या या दुसऱ्या भागात पुष्पाचा एक गॅंगस्टर म्हणून प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. अल्लूबरोबर यामध्ये फहाद फाजील, रश्मिका मंदाना आपल्याला बघायला मिळतील. मध्यंतरी ज्यापद्धतीने देशातील सारे चित्रपटप्रेमी केजीएफच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत होते तितक्याच आतुरतेने सध्या प्रेक्षक पुष्पाच्या दुसऱ्या भागाची वाट बघत आहेत.