* मल्याळम ‘शटर’ आता मराठीत!
मल्याळम भाषेत लोकप्रिय ठरलेला ‘शटर’ हा चित्रपट मराठीत तयार करण्यात येत आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक व्ही.के. प्रकाश, संजीव एम. पी. आणि प्रकाश बारे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मूळ मल्याळम चित्रपट ‘शटर’चे लेखन जॉय मॅथ्यु यांनी केले होते.
या चित्रपटात सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, जयवंत वाडकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. के. प्रकाश यांचे आहे.
* ‘गाव थोर पुढारी चोर’चा मुहूर्त
मंगेश मुव्ही एन्टरप्रायजेस्च्या ‘गाव थोर पुढारी चोर’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक पितांबर काळे, निर्माते मंगेश डोईफोडे, अभिनेत्री प्रेमा किरण, अभिनेते चेतन दळवी आदी उपस्थित होते. या वेळी हजारे म्हणाले, कला हे केवळ मनोरंजन नसून ते सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे, हा दृष्टीकोन ठेवून कलाकारांनी काम करणे आवश्यक आहे.
* ‘एकता एक पॉवर’चे म्युझिक लॉन्च
राहुल एन्टरप्रायजेस प्रस्तुत आणि अश्विनी-राहुल एन्टरप्रायजेस निर्मित ‘एकता एक पॉवर’ या चित्रपटातील गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन नुकतेच एका कार्यक्रमात महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते झाले. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक मकरंद देशपांडे आणि चित्रपटातील अन्य कलाकार व तंत्रज्ञ या वेळी उपस्थित होते.
* ‘सांगाती’ चित्रपट लवकरच प्रदर्शित
आनंदा प्रॉडक्शनचा ‘सांगाती’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा प्रवीण शांताराम यांची असून पटकथा-संवाद रामविजय परब यांचे आहेत. प्रशांतसिंह हबीर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात आस्तिक आणि नास्तिक, देव आहे की नाही असा विषय हाताळण्यात आला आहे. चित्रपटात सतीश पुळेकर, स्मिता ओक आणि अन्य कलाकार आहेत.
* ‘भाकर’मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न
तिरुपती बालाजी मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि वऱ्हाड चित्र निर्मित ‘भाकर’ या चित्रपटात शेतकरी, त्याचे भावविश्व आणि त्याला भेडसाविणाऱ्या प्रश्नांचा वेध घेण्यात आला आहे. हा चित्रपट २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
* ‘हुतात्मा भाई कोतवाल’ पडद्यावर
 स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणारे हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावर याच नावाचा चित्रपट तयार केला जात आहे. हुतात्मा भाई कोतवाल यांचे कार्यक्षेत्र नेरळ, माथेरान, कर्जत असे होते. मात्र त्यांच्या कार्याचा प्रभाव राज्यभरातील स्वातंत्र्य चळवळीवर पडला होता. वीर कोतवाल फाऊंडेशनतर्फे शशिकांत चव्हाण या चित्रपटाची निर्मिती करत असून चित्रपटाची पटकथा एफ. एम. इलियास व इब्राहिम अफगाण यांची आहे.चित्रपटाचे संगीत अमर मोहिले यांचे आहे. हुतात्मा भाई कोतवाल यांचे जीवन आणि त्यांनी केलेले कार्य नव्या पिढीला माहिती व्हावे, या उद्देशाने चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
* ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’
सिल्व्हर ऑटमन प्रॉडक्शनच्या ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील गाण्यांच्या ध्वनिफीतीचे प्रकाशन नुकतेच झाले. ही गाणी अश्विनी शेंडे यांनी लिहिली असून संगीत बापी तुतूल यांचे असून ही गाणी ऋषिकेश कामेरकर व नेहा राजपाल यांनी गायली आहेत.  चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन ऋषिकेश मोरे यांचे आहे.