सिनेमा
७० आणि ८० च्या दशकात वेगळा आशय असलेल्या कलात्मक चित्रपटांचं एक युग निर्माण करण्यात महत्त्वाचा हातभार असणारी संस्था म्हणजे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, म्हणजेच एनएफडीसी. ९० च्या दशकात मात्र ही संस्था पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर होती, पण गेल्या ६-७ वर्षांपासून एनएफडीसीने अत्यंत व्यावसायिक पद्धतीने काम करीत आपलं अस्तित्व पुन्हा दाखवून दिलं आहे.
भारतामध्ये १९८० च्या दशकाच्या शेवटपर्यंतचा काळ हा वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवू पाहणाऱ्या दिग्दर्शकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीचा काळ होता, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. जे विषय नेहमीच्या पठडीतल्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये मांडता येणं शक्य नव्हतं ते विषय अशा प्रकारच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून मांडता येणं या काळादरम्यान लेखक-दिग्दर्शकांना जमू लागलं होतं. अशा प्रकारच्या समांतर चित्रपटांचं एक प्रकारे ते भारावलेलं सुवर्णयुगच होतं. प्रेक्षकांची अभिरुची आणि त्यांच्या सामाजिक जाणिवा नव्याने समृद्ध करणाऱ्या या चित्रपटयुगाला भारतीय चित्रपटसृष्टीत ‘न्यू वेव्ह सिनेमा’ म्हणूनही संबोधण्यात येतं. या चित्रपटविषयक चळवळीमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत ज्या मोजक्याच संस्थांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान राहिलं आहे त्यापकीच एक संस्था म्हणजे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, अर्थातच एनएफडीसी. तरुण चित्रपट दिग्दर्शकांच्या कथांना पािठबा देऊन त्यांना चित्रपट बनवण्यासाठी सर्व पातळय़ांवर मदत करण्याचं काम गेली अनेक र्वष एनएफडीसी करत आली आहे. ‘सलाम बॉम्बे’ (दिग्दर्शक- मीरा नायर), ‘जाने भी दो यारों’ (दिग्दर्शक- कुंदन शाह), ‘मिर्च मसाला’(दिग्दर्शक- केतन मेहता), ‘पेस्तोन्जी’ (दिग्दर्शक- विजया मेहता) आणि ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘अल्बर्ट िपटो को गुस्सा क्यो आता है?’ (दिग्दर्शक- सईद मिर्जा) अशा अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या एनएफडीसीचा कारभार नंतरच्या काळात मात्र पूर्णपणे थंडावला होता. भारतीय चित्रपट विकास क्षेत्रामध्ये आपल अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणारी ही महत्त्वाची संस्था गेल्या ५-६ वर्षांत मात्र पुन्हा एकदा नव्या जोमाने उभी राहत असल्याचे एक आशादायी चित्र आपल्याला सध्या बघायला मिळत आहे.

एनएफडीसीला नवी दिशा देऊन संस्थेच्या दैनंदिन कामामध्ये नवा जोम आणि नवचतन्य निर्माण केलंय एनएफडीसीच्या विद्यमान कार्यकारी संचालिका नीना लाथ गुप्ता यांनी. इंडियन रेव्हेन्यू सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक संचालिका पदावर दीर्घकाळ काम करणाऱ्या नीना लाथ गुप्ता यांनी २००६ मध्ये एनएफडीसीच्या कार्यकारी संचालिका पदाची सूत्रे हाती घेतली आणि तेव्हापासून संस्थेच्या कार्यपद्धतीत हळूहळू सकारात्मक बदल दिसून येऊ लागला. चित्रपट क्षेत्राविषयी तशी फारशी माहितीही नसलेल्या गुप्ता यांनी अल्पावधीतच, संस्थेच्या मूलभूत उद्दिष्टांनुसार आपल्या कामाचे प्राधान्यक्रम ठरवून घेतले आणि त्यानुसार काम करावयास सुरुवात केली.  त्याचा परिणाम असा झाला की बऱ्याच वर्षांपासून तोटय़ात चालणाऱ्या एनएफडीसीने नीना लाथ गुप्ता रुजू झाल्यापासून दुसऱ्याच वर्षांत विक्रमी नफ्याची नोंद केली. त्यानंतरच्या काळात चित्रपटनिर्मिती आणि विकासाच्या दृष्टीने एका नंतर एक असे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यास त्यांनी सुरुवात केली.  
पूर्वसंचित एनएफडीसीचे
स्वातंत्र्योत्तर काळात, भारतामध्ये चित्रपट विकासाच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने १९६० मध्ये फिल्म फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना केली होती. या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वेगळ्या विषयावरच्या चित्रपटनिर्मितीसाठी अर्थपुरवठा करण्यात येऊ लागला, आणि त्यामुळे नव्या दमाच्या लेखक-दिग्दर्शकांना वेगळ्या विषयांचे सिनेमे करता येऊ लागले. फिल्म फायनान्स कॉर्पोरेशनचं रूपांतर नंतर नॅशनल फिल्म  डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी)मध्ये करण्यात आलं. आत्तापर्यंत फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन आणि नंतर एनएफडीसीच्या माध्यमातून िहदी आणि वेगवेगळ्या भारतीय भाषंतील सुमारे ३०० चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. एनएफडीसीचा मूळ उद्देशच वेगळ्या विषयावरच्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणं आणि त्यासाठीची व्यवस्था तयार करणं असल्यामुळे आत्तापर्यंत त्यादृष्टीनेच त्यांची वाटचाल राहिली आहे. त्यामुळे एकंदरीत चित्रपटनिर्मिती आणि त्यातील आशय या संदर्भात नेहमीच एनएफडीसीने कायम दर्जा राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण इतर सरकारी संस्थेत असतात त्याप्रमाणंच इथल्याही प्रशासकीय यंत्रणांमधील कारभारामुळे हळूहळू ९०च्या दशकात या संस्थेची एकदम अस्तित्वहीन होण्याइतपत वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता एनएफडीसी पुन्हा कात टाकताना दिसतेय.
नवीन उपक्रम
 नीना लाथ गुप्ता यांनी आपला पदभार सांभाळल्यानंतर चित्रपटसृष्टीच्या विकासाच्या दृष्टीने अनेक नवीन उपक्रम हाती घेतले. सुरुवातीलाच त्यांनी काही ठोस निर्णय घेऊन कंपनीचं पुनरुज्जीवीकरण करण्याच्या दृष्टीने सिकंदराबाद, गुवाहाटी आणि बंगलोर येथील कार्यालयं बंद करून टाकली. अनावश्यक स्टाफ कमी करून अनेक र्वष रिकाम्या असलेल्या पदावर चांगल्या लोकांची नियुक्ती केली आणि त्यानंतर SBI कॅपिटलच्या माध्यमातून त्यांनी ४६ कोटी एवढी रक्कम उभी केली. २००७ साली एनएफडीसीने ‘फिल्म बाज़ार’ नावाने एक अनोखा उपक्रम सुरू केला. चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपटनिर्मिती संस्था यांच्यासोबत सामंजस्य करार करून, अशा चित्रपटांसाठी फिल्म फेस्टिवल्सच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चित्रपटाच्या विक्रीची संधी उपलब्ध करून देणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. २०१२ मध्ये एनएफडीसीने चित्रपट प्रदर्शनासाठी ‘सिनेमा ऑफ इंडिया’ नावाने आपला नवा ब्रॅण्ड लोकांसमोर सादर केला. या ब्रॅण्डद्वारे एनएफडीसीच्या जुन्या चित्रपटांवर प्रक्रिया करून ते चित्रपट नव्या रूपात सिनेमागृहात प्रदíशत करण्यात आले. ‘जाने भी दो यारों’ हा चित्रपट अशा पद्धतीनेच चित्रपटगृहात पुन्हा प्रदíशत करण्यात आला होता. आत्तापर्यंत जवळपास ७० चित्रपट या ब्रॅण्डद्वारे प्रदíशत करण्यात आले आहेत. व्हिडीओ ऑन डिमांड च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चित्रपट पोहचवले जावेत यासाठी एनएफडीसी प्रयत्नशील आहे. नीना लाथ गुप्ता यांच्या मते, ‘एनएफडीसी ही एक चित्रपट विकास विषयक कार्य करणारी संस्था असल्यामुळे फक्त चित्रपटनिर्मिती हा आमचा उद्देश नाही. चांगल्या स्क्रिप्ट्स लिहिल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करण्यापासून ते त्या चित्रपटांच्या योग्य प्रदर्शनासाठीची यंत्रणा तयार करणं या सर्व गोष्टींसाठी आम्ही एक माध्यम म्हणून काम करणार आहोत. चित्रपटनिर्मिती प्रक्रिया ही एक निरंतर बदलत जाणारी प्रक्रिया आहे, काळाप्रमाणे होत जाणाऱ्या बदलाप्रमाणे आपल्यालाही बदलत जायला हवं.’    
नवीन विषय हाताळले जावेत आणि चित्रपट लेखकांच्या स्किल्स वाढाव्यात या उद्देशाने एनएफडीसीने ‘स्क्रीन रायटर्स लॅब’ हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये चित्रपट लेखकांना तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्यांच्या स्क्रिप्ट्सला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दृष्टीने विकसित करण्याची संधी मिळते. एनएफडीसीने दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अशी मराठी चित्रपट लेखकांची एक कार्यशाळा नुकतीच आयोजित केली होती. त्यालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. या वर्षी रिलीज होऊन सर्वाना आवडलेली ‘लंच बॉक्स’ या फिल्मची स्क्रिप्टसुद्धा अशा लॅबमधून तयार होऊन आलेलीच स्क्रिप्ट होती. ‘वर्क इन प्रोग्रेस’ ही लॅब म्हणजे पूर्वीच्याच उपक्रमाचा पुढचा टप्पा होता. गोवा फिल्म फेस्टिवलच्या ‘फिल्म बाजार’ दरम्यान काही निवडक चित्रपटाच्या रफ कटचे सादरीकरण एका अनुभवी आंतरराष्ट्रीय पॅनेलसमोर केले जाते. हे अर्धवट अवस्थेतील चित्रपट पाहून पॅनेलमधील तज्ज्ञ दिग्दर्शकाला त्यात आंतरराष्ट्रीय दर्जानुसार एडिटिंग, साऊंड इत्यादी विभागांत आवश्यक ते बदल सुचवतात. या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या गोवा फिल्म फेस्टिवलच्या वर्क इन प्रोग्रेस लॅबमध्ये पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे, ज्यात ‘किल्ला’ या एका मराठी चित्रपटाचाही समावेश आहे.  
२०१२-१३ या वर्षांत एनएफडीसीने सात चित्रपटांची निर्मिती केली. ज्यात दिबांकर बॅनर्जी यांच्या ‘शांघाय’, रितेश बात्रा दिग्दíशत ‘लंच बॉक्स’, आनंद गांधी यांचा बहुचíचत ‘शिप ऑफ थिसिस’  आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गुरुिवदर सिंग दिग्दíशत ‘अन्हे घोरी दा दान’ या पंजाबी चित्रपटाचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले अस्तित्व दाखवून दिले आहे आणि प्रेक्षकांनीही या सर्व चित्रपटांचे कौतुक केलेले आहे. कान फिल्म फेस्टिवलला आपल्या चित्रपटांचं प्रदर्शन असो किंवा कुठल्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणी भारतीय चित्रपटांचं मार्केटिंग करणं असो, एनएफडीसी आता एका नव्या दृष्टिकोनातून भारतीय चित्रपटांच्या विकासासाठी झटत असल्याचं चित्र दिसत आहे. या नव्याने चालना मिळालेल्या एनएफडीसीच्या कार्याची पुढची दिशा काय असेल याबद्दल गुप्ता म्हणतात की, अजून खूप काही गोष्टी करायच्या आहेत. ही एक सुरुवात आहे. चित्रपट व्यावसायिकासाठी प्रशिक्षण ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे हुशार लोकांची कमतरता नाही पण त्यांना योग्य दिशा देऊन त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून देता यायला हव्यात असं वाटतं. आम्ही ज्या पद्धतीच्या चित्रपटांना साहाय्य करतोय, अशा चित्रपटांसाठी मुबलक चित्रपटगृहांची कमतरता आहे. त्यासाठी मुंबईला खास चित्रपटगृह बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. चित्रपटनिर्मितीच्या सर्व प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय भागीदारी हा एक अजून महत्त्वाचा आणि आपल्याकडे अत्यंत दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. आपला सिनेमा भारताबाहेर घेऊन जायचा झाल्यास आज अशा भागीदारीची अत्यंत गरज आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एके काळी कलात्मक सिनेमाच्या चळवळींमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एनएफडीसीने पुन्हा एकदा सध्या संक्रमण अवस्थेतून जाणाऱ्या आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आपले अस्तित्व दाखवून देत, या चळवळीला पुढे नेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बदलत्या भारतीय सिनेमाची ही एक नांदीच म्हणावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nfdc cinemas of india
Show comments